पुणे : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासनीतीमुळे महायुती भक्कम आहे. दीड-पावणेदोन वर्षांपूर्वी लोकांच्या मनातील युती आम्ही स्थापन केली. त्यानंतर अजित पवार सोबत आले. महायुतीचे हे सरकार पडणार, पडणार, असे काही लोक सतत म्हणायचे. या लोकांनी कोविड काळात भ्रष्टाचार केला. सध्या घरात बसून फेसबूकवर मोदींना शिव्या घालण्याचे काम ते करत आहेत. जर मोदींनी वक्रदृष्टी केली, तर या फेसबुकवाल्यांना फेस आल्याशिवाय राहणार नाही, असा हल्ला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता चढवला.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी पार पडला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्ह, खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मागील सरकारने सुरू असलेली कामे बंद पाडली. यांच्यात अहंकार ठासून भरलेला होता. हा अहंकार आपल्याला मोडित काढायचा आहे. विरोधकांना विकास कामातून उत्तर देणार आहे. पुणे जिल्ह्यातील महायुतीचे चारही उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील, असा मला विश्वास वाटतो. राज्य आणि देशात मोदींची लाट आहे. मोदींच्या सभांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे देशात अब की बार ४०० पार, तर राज्यात ४५ पार जायचे आहे.