सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील सोलापूर जिल्ह्यात नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा होवून गेला त्यानंतर शरद पवार देखील सोलापूर दौऱ्यावर असतांना आगामी लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीत शेतकरी कामगार पक्षासह वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांना घेण्याचा निर्णय पक्का झाला आहे. यासंदर्भात आपली माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी ३५ ते ३६ जागावाटपाचा तिढा सुटला आहे. उर्वरित जागांवर लवकरच निर्णय होईल. सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला घेण्याबाबत आज सांगू शकत नाही. तशी कोणतीही चर्चा झाली नाही. जिल्ह्यात आमच्या पक्षाला संधी आहे. असे असले तरी आघाडीत मतभेद निर्माण होतील, अशी कोणतीही कृती आम्ही करणार नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. आपल्या विचारांशी सहमत नसलेल्या घटकांमध्ये दहशत निर्माण करून त्यांना नाउमेद करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून ईडीचा वापर केला जात आहे. शासनाकडून राग- द्वेषातून राजकीय विरोधकांवर ईडी कारवाईचे हत्यार वापरले जात असल्याचे खा. पवार म्हणाले.
कुंभारी येथील रे नगर या असंघटित कामगार वसाहत निर्मिती प्रकल्पाचे शंभर टक्के श्रेय हे माजी आमदार नरसय्या आडम यांचे आहे. या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विधायक कार्य करणाऱ्या आडम यांच्यासंदर्भात चार शब्द चांगले बोलून मास्तरांना प्रोत्साहित केले असते तर शोभून दिसले असते. प्रत्येक ठिकाणी डावी-उजवी विचारसरणी बघत बसल्याने विधायक काम करणाऱ्यांना प्रोत्साहित करण्याची भूमिका बाजूला राहते. बेरोजगारी, महागाई, सोलापूरचा औद्योगिक विकास यावर पंतप्रधानांचे भाष्य अपेक्षित होते. त्यावर न बोलता भावनिकतेच्या आडून त्यांनी मूळ मुद्द्यांना भरकवटल्याची टीका खा. पवार यांनी केली.