शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही; जय हिंद रोज १२ हजार मेट्रिक टन ऊस गाळप करणार : माने देशमुख
जय हिंद शुगर्सच्या बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा उत्साहात
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि. ८ : यंदा अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यात विक्रमी उस लागवड झाली आहे.तरी शेतकऱ्यांना घाबरण्याचे कारण नाही.कारण जयहिंद शुगरची एका दिवसाची गाळप क्षमता पाच हजार ते बारा हजार मेट्रीक टन आहे.यंदा आम्ही १५ लाख मेट्रीक टन उस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे,असे चेअरमन गणेश माने-देशमुख यांनी सांगितले. आचेगांव येथे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर जय हिंद शुगर्सचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जयहिंद उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव माने-देशमुख,चेअरमन गणेश माने-देशमुख,मुख्य मार्गदर्शक बब्रुवान माने-देशमुख, व्हाईस चेअरमन विक्रमसिंह पाटील, शालिवाहन माने-देशमुख, कारखान्याचे एम डी आर पी देशमुख, शेती अधिकारी चंद्रशेखर जेऊरे, अमोल जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी कार्यक्रमाच्या सुरूवातीला हंजगी येथील श्रीशैल पाटील,काशिनाथ कुंभार,दादाराव कोळी या दाम्पत्यांच्या हस्ते होमहवन व सत्यनारायणाची पूजा संपन्न झाली.या पूजानंतर बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा उत्साहात पार पडला. आजपर्यंत जयहिंद शुगर्सने नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. आजपर्यंत ऊस उत्पादकांनी ही जयहिंद परिवाराला सहकार्य केले आहे. यापुढे देखील सहकार्याची गरज असल्याचे बब्रुवान माने-देशमुख यांनी सांगितले.
यावेळी अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी बांधव, वाहन मालक, टोळी मुकादम मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळ्याचे वेदोपचार वेदमुर्ती बसवराज शास्त्री हिरेमठ यांनी केले.