पुणे : वृत्तसंस्था
आषाढी एकादशी एका दिवसावर आली तरी बाजारांत भगर आणि साबुदाण्याची मागणी वाढलेली नाही. दर वर्षीच्या तुलनेत मागणी घटल्याने मार्केटयार्डातील भुसार बाजारात साबुदाण्याच्या दरात मागील चार दिवसांत किलोमागे एक ते दीड रुपयांनी घट झाली आहे. भगरीचे आधीच वाढलेले दर कायम आहेत.
राज्यात उद्या, बुधवारी आषाढी एकादशी साजरी होणार आहे. या मंगलदिनी बहुतांश जण उपवास करीत असल्याने दर वर्षी साबुदाणा आणि भगर या खाद्यपदार्थांना मोठी मागणी असते. तमिळनाडू येथील सेलम जिल्ह्यातून संपूर्ण देशात साबुदाण्याचा पुरवठा होतो. आषाढी एकादशीसाठी महाराष्ट्रातून साबुदाण्याची मागणी वाढेल, अशी शक्यता गृहीत धरून सेलम जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी साबुदाणाच्या दरात तेजी आणण्याचा प्रयत्न केला. 15 ते 20 दिवसांपूर्वी किलोमागे दोन ते अडीच रुपयांनी दरवाढ केली. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास 20 टक्के मागणी कमी असल्याने चार दिवसांपूर्वी पुन्हा दरात किलोमागे एक ते दीड रुपयांनी घट झाली आहे.
भुसार बाजारात दररोज 200 ते 250 टन साबुदाण्याची आवक होत आहे. साधारण आवक यापेक्षा जास्त असते. भगरीचे आधीच वाढलेले दर कायम आहेत, अशी माहिती साबुदाणा, भगरीचे व्यापारी अशोक लोढा यांनी दिली. दर वाढल्याने भगरीलाही कमी मागणी असल्याचे लोढा यांनी सांगितले. मार्केट यार्डात नाशिक जिल्ह्यातून दररोज 25 ते 30 टन भगरेची आवक होत आहे. भगर आणि साबुदाण्याप्रमाणे शेंगदाण्याचीही मागणी मर्यादित आहे. आषाढी एकादशीच्या दरवर्षीच्या तुलनेत शेंगदाण्याला मागणी कमी असल्याचे मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी सांगितले.
किरकोळ बाजारातील दर
साबुदाणा : 90 – 95 रुपये
भगर : 120 रुपये
शेंगदाणे : 140 रुपये