सोलापूर : प्रतिनिधी
उसने पैसे मागितल्याच्या कारणावरून रमेश शरणप्पा निंबाळ (वय-४५, रा.दुधनी) यांचा खून केल्याप्रकरणी सैदप्पा चंद्रशा व्हसुर व त्याचा मुलगा चन्नप्पा सैदप्पा व्हसुर (दोघेही रा. दुधनी) यांची जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी निर्दोष मुक्तता केली.
यातील मयत रमेश निंबाळ यांनी आरोपी सैदप्पा व्हसुर यास हात उसने म्हणून ९ लाख रुपये दिले होते. मयत रमेश निंबाळ यांनी सतत सैदप्पा व्हसुर यास ते पैसे मागत होता. त्यामुळे सैदप्पा व्हसुर हा त्यांच्यावर चिडून होता. घटनेच्या दिवशी आरोपीने त्यास बळजबरीने स्वतःच्या गाडीवर बसवून नेऊन गेला.
दरम्यान, गावातील लोकांकडून मयताच्या पत्नीस समजले की तिच्या पतीस धारदार हत्यारांनी वार करून जिवे ठार मारले आहे. त्यावरून तिने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. परिस्थितीजन्य पुरावा हा आरोपीने गुन्हा केल्यासंदर्भात सरकारी पक्षाने शाबित केला नसल्याचा युक्तिवाद मांडण्यात आला. तो ग्राह्य धरण्यात आला. या प्रकरणी आरोपीच्या वतीने अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. सतीश शेटे, अॅड. निशांत लोंढे यांनी तर सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह रजपूत यांनी काम पाहिले.