वाशिम : बंजारा समाजाची बदनामी केल्याप्रकरणी बंजारा परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष श्याम राठोड यांनी भाजप नेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार अतुल भातखळकर, भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार आशिष शेलार, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात वाशिम जिल्ह्यातील मनोरा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूजा चव्हाण या मुलीची तर बदनामी झालीच. पण तिच्या परिवाराची आणि संपूर्ण बंजारा समाजाचीही बदनामी झाली. त्या पीडितेने आत्महत्या केली की काय? याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र भाजपच्या नेत्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जात पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव टाकला आणि तपासात अडथळा निर्माण केला, असा आरोप श्याम राठोड यांनी केला आहे.
दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणामुळे अडचणीत आलेले शिवसेना मंत्री संजय राठोड यांना विरोधी पक्षाच्या वाढत्या दबावानंतर अखेर राजीनामा द्यावा लागला. पूजा चव्हाण प्रकरणी भाजपने आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं होतं. संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने लावून धरली होती. तसेच याप्रकरणावरून भाजपने सरकारला सळो की पळो करून सोडलं होतं.