मुंबई, दि. १३ : परतूर (जि. जालना) नगरपरिषद हद्दीतील आणि महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेल्या एका संस्थेकडील इनामी जमिनीची अनधिकृतपणे, बेकायदेशीररित्या खरेदी-विक्री करुन तसेच काही जागेवर अतिक्रमण करुन बांधकाम केल्याप्रकरणी जालना जिल्हा वक्फ अधिकारी यांच्या फिर्यादीवरुन परतूर पोलीस ठाण्यात ९ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना अल्पसंख्याक विकास आणि औकाफ विभागाचे मंत्री नवाब मलिक म्हणाले की, वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या ट्रस्ट आणि संस्थांकडून मुस्लिम समाजहिताचे कार्य केले जाते. पण काही अपप्रवृत्तींकडून याचा गैरफायदा घेतला जातो. अशा अपप्रवृत्तींना रोखण्यासाठी तसेच वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या संस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी शासनाकडून कडक पावले उचलली जातील. अशा अपप्रवृत्तींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
परतूर (जि. जालना) येथील कब्रस्तान की मस्जिद आणि मजार हजरत शाह सुलेमान शाह (सुलेमान शाह की मस्जिद) या वक्फ अधिनियमांतर्गत नोंदणीकृत आहेत. या मस्जिदच्या नावे परतूर नगरपरिषद हद्दीत ६ हे. ४९ आर तसेच १ हे. ८७ आर इतक्या क्षेत्रफळाच्या जमिनी आहेत. या जमिनीचा वापर मस्जिदच्या सेवेसाठी तसेच दैनंदिन खर्चासाठी कायमस्वरुपी उत्पन्नाचे साधन म्हणून करण्यात येतो. ही मस्जिद वक्फ अधिनियमांतर्गत नोंदणीकृत असल्याने त्याच्याकडील कोणत्याही मालमत्तेची विना परवानगी खरेदी-विक्री, गहाण, दान, बक्षीस इत्यादी होऊ शकत नाही. तथापी, जिल्हा वक्फ अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नवाब शाह उस्मान शाह, काजी नुरोद्दीन काजी अब्दुल रहीमोद्दीन, शेख आमेर उर्फ शानदार हनिफ कुरेशी (सर्व रा. परतूर) यांनी संगनमत करुन या ईनामी जनिमीची बेकायदेशीररित्या खरेदी-विक्री करुन गैरव्यवहार केल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यानुसार याप्रकरणी नवाब शाह उस्मान शाह, काजी नुरोद्दीन काजी अब्दुल रहीमोद्दीन, शेख आमेर उर्फ शानदार हनिफ कुरेशी, दत्ता शंकर पवार, शेख अब्दुल सत्तार शेख रज्जाक, लुकमान कुरेशी नादान कुरेशी, हुसेन यासीन शेख, अजहर शेख युनुस शेख, मोहम्मद शरीफ अब्दुल हमीद कुरेशी या ९ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेख खालेद शेख अहमद कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, परतूर) यांनी परतूर पोलीस ठाणे येथे फेब्रुवारी व मार्च 2021 रोजी अर्ज देऊन कळविले की, आमेर उर्फ शानदार हनीफ कुरेशी व इतर 15 ते 20 लोकांनी या इनामी जमिनीत अनधिकृतपणे, बेकायदेशीररित्या खरेदी-विक्री केलेली आहे. काही जागेवर स्वत: अतिक्रमण करुन बांधकाम केले आहे. या अर्जाच्या संदर्भात वक्फ कार्यालयातर्फे 09 ऑक्टोबर 2021 रोजी स्थळपाहणी व पंचनामा केला असता असे निदर्शनास आले की, शेख आमेर उर्फ शानदार कुरेशी यांनी ही ईनामी जमीन शेख अजहर शेख युनुस यांना व इतर लोकांना विनापरवाना स्वत:चे अधिकार वापरून प्लॉटींग करून भाडे करारनामा व इतर रितीने अनधिकृतपणे दिली आहे. सध्या या ईनामी जमीनीमध्ये काही जण अनधिकृतपणे व्यवसाय करीत आहे. काही लोक पत्र्याचे शेड वगैरेचे काम करत आहेत. तसेच नवाब शाह उस्मान शाह यांनी अनधिकृतपणे लोकांना दिलेल्या या जागेबाबत 100 रुपयांचे बाँड पेपरवर विनापरवानगी वक्फ मंडळ भाडे करारनामे केले आहेत. या ईनामी जमिनीमध्ये नवाब शाह उस्मान शाह यांनी अनधिकृतपणे विनापरवानगी जागा भाड्याने दिली आहे. ईनामदारांनी स्वत:चे अधिकारात विनापरवानगी या जागेचे मुख्त्यारआम पत्र काजी नुरोद्दीन काजी मोहम्मद अब्दुल रहिम व शेख अमीर उर्फ शानदार मोहम्मद कुरेशी यांच्या नावाने स्टँप पेपर करून दिला आहे. सर्वे नंबर 138 व 87 ही जमीन वक्फ संपत्ती असल्यामुळे ती विकता येत नाही. विना परवागी भाडेपट्ट्यावर देता येत नाही. नवाब शाह उस्मान शाह यांनी गुन्हेगारी कट रचून व संगनमत करून खोटा व बेकायदेशीर दस्त तयार करून वक्फ संपत्तीचा बेकायदा भाडेव्यवहार करुन इतर लोकांना प्लॉट पाडून बेकायदेशीररित्या भाडेपट्ट्यावर दिल्याचे, विकल्याने दिसून येते, असे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. त्यानुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मंत्री नवाब मलिक म्हणाले की, अशा गैरव्यवहारांचा शोध घेऊन त्याबाबत कठोर कारवाई करण्याच्या सूचना विभागाच्या तसेच वक्फ मंडळाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मागील २ वर्षात वक्फ इनाम जमिनी बेकायदेशीररित्या खालसा करणे, विक्री करणे, अवैधरित्या मावेजा घेणे, अवैध भाडेपट्टीवर देणे या कारणास्तव राज्यातील विविध ठिकाणी ७ प्रकरणांमध्ये महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या पुढाकाराने एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. आष्टी (जि. बीड) येथील एका प्रकरणात उपजिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. वक्फ मंडळामार्फत राज्यातील संस्थांचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी मागील २ वर्षात कार्यवाही करण्यात आली आहे. राज्यात वक्फ मंडळांतर्गत सुमारे ३० हजार संस्था नोंदणीकृत असून त्यांचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी वक्फ मंडळामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. गैरव्यवहार करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंत्री श्री. मलिक यांनी दिली. |