ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चोरीचे पाच गुन्हे उघड ; लाखोंचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : प्रतिनिधी

गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या गळयातील मंगळसूत्र चोरीचे दाखल गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. या पथकाने गड्डा यात्रेत चोरीस गेलेले मंगळसूत्र आणि चोरीस गेलेल्या ५ मोटरसायकली हस्तगत केल्या. एक विधी संघर्ष बालिका आणि तीन तरुणांकडून १.९० लाख किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे माहिती कक्षातून सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, नुकत्याच पार पडलेल्या होम मैदानवरील गड्डा यात्रेच्या गर्दीतून एका महिलेच्या गळयातील मंगळसूत्र चोरीस गेल्याचा गुन्हा सदर बझार पोलिसांकडे दाखल असून, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे व त्यांच्या पथकास एक विधी संघर्ष बालिका मिळून आली. चौकशीत तिच्या जवळील मंगळसूत्र गड्डा यात्रेत चोरी केल्याची कबुली दिली.

सपोनि निरगुडे व त्यांच्या पथकाने अरबाज मेहबुब शेख (वय-२४, रा. शास्त्री नगर अंन्सारी चौक, सोलापूर) याच्या ताब्यातून चोरीच्या २ मोटार सायकल, श्रीराम खुबराम यादव (वय २९, रा. तुलसीपुर जि. हरदोई, उत्तर प्रदेश) याच्याकडून चोरीच्या २ मोटार सायकल आणि सुर्यकांत आप्पाराव हेलगर (वय- ३९, रा. भवानी पेठ, सोलापूर) याच्याकडून चोरीची १ मोटार सायकल असे १,७०,००० रुपये किंमतीचे ५ मोटार सायकल जप्त केल्या. ही कामगिरी व. पो. नि. सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली, सपोनि जीवन निरगुडे, पोलीस अंमलदार दिलीप किर्दक, वाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, सतिश काटे, बाळु काळे, अविनाश पाटील, प्रकाश गायकवाड, महिला पोलीस अंमलदार तांबोळी व लंगोटे यांनी पार पाडली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!