चेन्नई सुरत प्रकरणी सलग दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट ; वरिष्ठ स्तरावर बैठकीचे नियोजन सुरू : हिंडोळे
अक्कलकोट, दि.१ : चेन्नई-सुरत ग्रीन फिल्ड हायवेच्याबाबतीत अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी आणखी एका शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेतली. भाजपचे ज्येष्ठ नेते महेश हिंडोळे व सुरेखा होळीकट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी भेट घेत आपली मागणी त्यांच्याकडे सादर केली.
बाजारभावाच्या पाचपट रक्कम शेतकऱ्यांना मिळावी ही आमची भूमिका आहे आणि यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांच्याकडे बैठक लावू, अशी माहिती हिंडोळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
याविषयी खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी व आमदार सचिन कल्याणशेट्टी हे ही सकारात्मक असून तेही वरिष्ठ स्तरावर बैठक लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याबाबतीत जिल्ह्यातील अन्य आमदारही बैठक लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यात अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, बार्शी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने बाधित आहेत. त्यांना नुकसान भरपाईचा मोबदला योग्य स्वरूपात मिळावा इतकीच माफक अपेक्षा आहे.या रस्त्यासाठी त्यांची जमीन कायमस्वरूपी संपादित होत आहे त्यामुळे योग्य मोबदला मागणे यात अजिबात गैर नाही. जो तो आपल्या पद्धतीने पाठपुरावा करत आहे.
प्रशासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा. रेडीरेकनर हे जमिनीचे बाजार भाव होऊ शकत नाही. बाजार भाव ठरविण्याचा संपूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे परंतु सध्या जो बाजार भाव ठरला आहे तो बाजार भाव शेतकऱ्यांना मान्य नाही, असे शेतकऱ्यांचे स्पष्ट मत आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.होळीकट्टी म्हणाल्या,
२०१३ चा भूसंपादन कायदा शेतकऱ्यांबद्दल सामाजिक बांधिलकी राखणारा असून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवता येणार नाही.याबाबतीत शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत आमची मागणी वरिष्ठ स्तरावर जाणार आहे. भाजप अल्प संख्यांक सेलचे नन्नु कोरबू म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर बैठक घेऊन ही मागणी शासनापर्यंत पोहोचवावी, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना शेतकऱ्यांच्यावतीने निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. या शिष्टमंडळात सोमलिंग निंबाळ, चेतन जाधव, सिद्धाराम कोरे, शांतप्पा हौदे, भीमन्ना माळी, वाहिद नाईकवाडी, सुनील दसले, लक्ष्मीपुत्र तेलुनगी, जग्गनाथ कलमनी, बसवराज हंबलगी, राजशेखर कुंभार, विजय चव्हाण, प्रशांत शिंदे, शिवाजी पाटील, मल्लिनाथ दसाडे, शिवयोगी ठक्का, संजय म्हंता यांच्यासह शेतकऱ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.