बीड : वृत्तसंस्था
देशभरात आगामी काळात लोकसभा निवडणूक होवू घातल्याने राज्यातील महायुतीच्यावतीने रविवारी राज्यभरात जिल्हा पातळीवर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासह मित्रपक्षांचे संयुक्त मेळावे घेण्यात अाले. यावेळी बीडमध्ये भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मंुडे यांचे बॅनरवर छायाचित्र नसल्याने खासदार प्रीतम मुंडे यांनी जोरदार अाक्षेप घेत अापल्या भाषणात तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याने त्यानंतर फोटो लावला गेला.
इकडे, सांगलीत रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत म्हणाले, निवडणुका आल्या म्हणून आम्हाला बोलावले. आम्ही बँडवाले आहोत का? फक्त वाजवायला बोलावताय का? नेमकं आम्हाला बोलावलंय का? तर अमरावतीच्या मेळाव्याला प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांनी दांडी मारली तर जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांनी लोकसभेत एकत्र काम करु, पण विधानसभेत दगा नको,अशा शब्दांत अजित पवार गटाच्या नेत्यांना खडसावले. रविवारी बीडमध्ये संक्रांतीच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या या मेळाव्यातून एकमेकांना गोड बोलण्याचा प्रयत्न मित्रपक्षांनी केला खरा मात्र, या मेळाव्यासाठीची सुरुवातच गोंधळाने झाली. व्यासपीठावरील बॅनरवर दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंचा फोटो नसल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी घोषणाबाजी करुन नाराजी व्यक्त केली. बॅनर बदला, फोटो लावा तरच आम्ही कार्यक्रमाला थांबू असा पवित्रा घेतला. त्यानंतर बॅनरच्या शेजारी मुंडेंचा फोटो लावला गेला.
मेळाव्यास पालकमंत्री धनंजय मुंडे, माजी आमदार अमरसिंह पंडित, आ. प्रकाश सोळंके, आ. बाळासाहेब आजबे, माजी मंत्री सुरेश नवले, माजी आमदार भिमराव धांेडे, शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे, भाजप जिल्हाप्रमुख राजेंद्र मस्के यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती. पक्षाआधी महायुतीकडून मुंडेची उमेदवारी जाहीर : दरम्यान, बीड लोकसभा निवडणूक प्रितम मुंडे की पंकजा मुंडे लढणार अशी चर्चा मागील काही दिवसांत हाेत होती. अद्याप भाजपने बीड लोकसभेचा उमेदवार घोषीत केला नाही मात्र रविवारी महायुतीच्या जिल्हा मेळाव्यात मात्र सर्व नेत्यांनी प्रितम मुंडे याच उमेदवार असतील अशी घोषणा केली.