ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पीक विम्याच्या रकमेबाबत माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी दिली महत्त्वाची माहिती

अक्कलकोट,दि.५ : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर अक्कलकोट तालुक्यात शनिवारपासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होत असल्याची माहिती माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी पत्रकारांना दिली. ऑक्टोबर महिन्यात यासाठी महसूलमंत्र्यांना आम्ही भेटलो होतो त्यावेळी निवेदन देखील दिले होते. त्याची दखल घेत त्यांनी विमा मंजूर होण्यासाठी सहकार्य केले आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. अडचणीतील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी म्हेत्रे यांनी पाठपुरावा केला होता.

तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्षाचे अर्थकारण खरीप पिकांवर अवलंबून असते. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, भुईमूग, उडीद, मूग यासह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. अडचणीतील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा निधी मिळाला आहे. यावरून तालुक्यात झालेल्या नुकसानीची स्पष्टता दिसून येते. संपूर्ण अक्कलकोट तालुक्यात मोठे नुकसान झाल्याने खरीपातील सर्व पिकांच्या जोखमेपोटी विमा कंपनीकडून रक्कम देण्याविषयी आदेश द्यावेत यासाठी महसूलमंत्र्यांकडे दि. १७ ऑक्टोबर रोजी निवेदन दिले होते.

यानंतर महसुलमंत्र्यांनी अक्कलकोट तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. आणि पुर्ततादेखील झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठे सहकार्य झाल्याचे म्हेत्रे यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील ३५२१४ शेतकऱ्यांकडून खरीप हंगामासाठी विमा उतरविण्यात आला होता. हणमगाव येथे अतिवृष्टी व पिक विम्याची रक्कम मिळवून दिल्याबद्दल म्हेत्रे यांच्यावर फुलांचा वर्षाव करून शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

तक्रार दिलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी रक्कम

तालुक्यातील ३५ हजार २१४ शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता.त्यापैकी २९ हजार ४६८ शेतकऱ्यांनी ॲप, कृषी विभागामार्फत, टोल फ्री क्रमांकवर तक्रारी दिले आहेत. तक्रार दिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपनीकडून रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून येत्या आठवड्याभरात बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल, अशी माहिती विमा कंपनीच्या जिल्हा समन्वयकानीं दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!