ध्यास विश्वसार्ह बातमीचा

साडे चार लाखांचा अवैध तांदूळ पकडला, अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याची कामगिरी

अक्कलकोट : कर्नाटकातून उमरग्याकडे अक्कलकोटमार्गे जात असलेला तांदळाचा ट्रक संगोगी (ता. अक्कलकोट) गावच्या अलीकडील पुलावर पोलिसांनी सापळा रचून पकडला. दहा लाखाच्या ट्रकसह चार लाख ५८ हजारचा तांदूळ असे सुमारे १४ लाख ५८ हजार रुपयांचे मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.याची दक्षिण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, याची फिर्याद पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय तानाजी भोसले बक्कल नंबर ८२४ नेमणूक अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन यांनी दिली आहे.

या घटनेतील संशयित आरोपींची नावे शिवकुमार शंकर राठोड रा. गुलबर्गा कर्नाटक राज्य, राहुल सुभाष जाधव रा.सिटीफार्म तांडा, ता.आळंद, जि.गुलबर्गा असे आहेत. दिनांक 26 जुलै रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास क्रमांक KA-22 0367 मधून केबावी तालुका-सुरपूर,  जिल्हा – यादगिर,  राज्य- कर्नाटक येथून अज्ञात तांदळाच्या मालकाचा साठविलेला सुमारे चार लाख 58 हजार 700 रुपये किमतीचा तांदूळ ट्रकमध्ये भरून उमरगा जिल्हा उस्मानाबाद येथे जात असताना पोलिसांनी पकडला.

इन्वाईसमधील तांदूळ व पंचनाम्यात मालट्रकमध्ये मिळालेले तांदूळ यात तफावत आढळून आल्याने पोलिसांनी संशयित गुन्हेगारावर अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याचा अधिक तपास पीएसआय छबु बेरड हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!