नागपूर : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यात अवकाळी पाऊस झाला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी देखील शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. दुसरीकडे राज्याच्या हिवाळी अधिवेशनात नेहमीच विरोधी पक्ष शेतकऱ्यांची भूमिका घेत आक्रमक देखील होत आहे. यावर आज विधान परिषदेत बोलताना कृषीमंत्री धनंजय मुंडे इशारा दिला आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ही राज्य शासनाची जागतिक बँक अर्थ साहाय्यित अत्यंत महत्त्वाची योजना असून या योजनेच्याद्वारे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ देण्याचे नियोजन शासन करत असताना या योजनेचा गैरफायदा घेऊन कोणी कोणत्याही प्रकारची फसवणूक करून शासनाचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न करत असेल तर, त्यावर शंभर टक्के कार्यवाही करून चुकीचे अनुदान लाटलेल्यांकडून सक्त वसुली करण्यात येईल, अशी ग्वाही आज विधान परिषदेत बोलताना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
अकोला जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत औजारे व ट्रॅक्टर वाटपाच्या संदर्भात गैरव्यवहार झाल्याची तक्रार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अमोल मिटकरी आदींनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली होती, त्याच्या उत्तरादाखल धनंजय मुंडे बोलत होते. अकोला जिल्ह्यात सदर योजनेतून ट्रॅक्टर व औजारे खरेदीच्या अनुदानासंदर्भात ज्या तक्रारी आल्या आहेत, त्याचा तपास सखोल पद्धतीने करण्यात येत असून, यातील दोषींवर सक्तवसुलीसह आवश्यकता भासल्यास पोलीस तक्रार देखील करण्यात येईल, असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.