ध्यास विश्वसार्ह बातमीचा

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून 37 कोटी रुपये मंजूर ,आमदार कल्याणशेट्टी यांची माहिती

अक्कलकोट, दि.२४: अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील 52 किलोमीटर लांबीच्या नऊ विविध रस्त्यांचा विकास करण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून 37 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे.

ग्राम सडक योजना लघुरुप (PMGSY ) या योजनेचा उद्देश हा पोहोचमार्ग नसणाऱ्या खेड्यांसाठी सर्व ऋतुंमध्ये वापरण्यास योग्य असे चांगले रस्ते ग्रामीण भागात बांधणे असा आहे.या बाबतीत अधिक माहिती देताना कल्याणशेट्टी यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजनेतून ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास करून वर्षभर ती चांगल्या दर्जाने वापरात यावीत यासाठी केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी मंजुर केलेल्या या 37 कोटींच्या रस्त्यात नाविंदगी ते कल्लहिपरगे (5.5 किमी),नाविंदगी ते नागणसुर (3 किमी),नागणसुर ते हैद्रा (7 किमी) अशा या 15.5 किमीच्या तीन रस्त्यांसाठी 12 कोटी 25 लाख 50 हजार रुपये, तर केगाव ते पानमंगरूळ (7 किमी), पानमंगरूळ ते कल्लहिपरगे (3 किमी) अशा या 10 किलोमीटर लांबीच्या दोन रस्त्यांसाठी 6 कोटी 24 लाख 36 हजार रुपये एवढा निधी तर दहिटणे ते सिंदखेड (4 किमी) साठी 2 कोटी 31 लाख 27 हजार रुपये इतका आहे.त्याचप्रमाणे गंगेवाडी पासून कासेगाव,उळे, उळेवाडी,बक्षीहिप्परगा मार्गे मुळेगाव तांडा पर्यंत (13.4 किमी), कासेगाव ते वडजी (3.4 किमी), एनएच 65 ते मुळेगाव मार्गे कुंभारी (5.5 किमी) अशा या तीन रस्त्यांच्या 22.3 किलोमीटरसाठी 16 कोटी 17 लाख 88 हजार रुपये इतका निधी मंजूर झाला आहे.

कोरोना काळात मंदावलेली कामे आता अधिक वेगाने सुरू होणार असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या सहकार्याने आताचे 37 कोटी मंजूर झाले आहेत.यापूर्वी देखील अक्कलकोट विधानसभा क्षेत्रासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी 100 कोटींपेक्षा जास्त निधी रस्ते विकास साठी मंजूर केले आहेत.

या आणखी मिळालेल्या 37 कोटींमुळे दळणवळण पायाभूत सुविधेत मोठी वाढ होऊन ग्रामीण भागातील रस्ते प्रवास आणखी सुखकर होण्यास मदत होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!