ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ट्रामा केअरबद्दल सर्वपक्षीय शिष्टमंडळ आरोग्यमंत्र्यांना भेटणार,अक्कलकोट येथील बैठकीत निर्णय

अक्कलकोट, दि.२४ : अक्कलकोट
शहरात रखडलेल्या ट्रामा केअर सेंटरच्या कामासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेणार असल्याचे सोमवारी झालेल्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत सांगण्यात आले.

गेल्या पाच वर्षापासून ट्रामा केअरचे काम प्रलंबित आहे.त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.ही बाब तालुक्याच्या दृष्टीने गंभीर असून यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी सोमवारी अक्कलकोट येथे भाजप वगळता इतर
सर्व पक्षाने एकत्रित बैठक घेतली.यात बैठकीमध्ये पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना भेटण्याबरोबरच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन या ट्रामा केअर संदर्भातील इतर सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा
निर्णय यात घेण्यात आला.

यात केवळ इमारतीचा प्रश्नही मार्गी लागून चालणार नाही तर कर्मचारी भरती आणि वैद्यकीय यंत्र सामग्रीचा विषय मार्गी लागणे फार गरजेचे आहे. पहिल्या टप्प्यात दोन दिवसात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची बैठक होईल.त्यानंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सोबत जाऊन आरोग्य मंत्र्यांची खास भेट घेतली जाईल,असे नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अशपाक बळोरगी यांनी सांगितले.

ट्रामा केअरचे काम ठेकेदाराने एक जून पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे त्यापुढील कामेदेखील तातडीने मार्गी लावणे गरजेचे आहे,असे शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय देशमुख यांनी सांगितले. ट्रामा केअर सेंटरची तालुक्याला खूप गरज आहे.त्यामुळे हे काम त्वरित मार्गी लावण्यासाठी यापुढे आम्ही सतत प्रयत्नशील राहणार आहोत, असे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन पाटील यांनी सांगितले.

हा प्रश्न सुटेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही यासाठी मोठे आंदोलन करण्याची तयारी आमची आहे,असे ज्येष्ठ नेते सुरेशचंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले. तालुक्यात कोरोनाचा शिरकाव प्रचंड झालेला आहे.माजी आमदार म्हेत्रे यांच्या काळात याला मंजुरी मिळाली आहे.तिसऱ्या लाटेचा विचार करून हे काम उभारण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत,असे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी बैठकीत सांगितले.

चार कोटी रुपयांचे काम तीन वर्षापासून रखडले आहे.ही चूक प्रशासनाची आहे. यापुढे आम्ही गप्प बसणार नाही,असे मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते गफुर शेरीकर यांनी सांगितले.या कामासाठी वेळ प्रसंगी सर्व पक्ष संघटनांच्या वतीने आंदोलन करण्याची तयारी आपली आहे, असे मातंग समाजाचे तालुकाध्यक्ष सुनील खवळे यांनी सांगितले.

या सर्व कामाला आपला पाठिंबा असून हे काम त्वरित पूर्ण होण्याच्या संदर्भात आपला देखील प्रयत्न राहील,असे माजी नगरसेवक उत्तम गायकवाड व माणिक बिराजदार यांनी बैठकीत बोलताना स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!