मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सुरु आहे. तर सरकारने एकदिवसीय अधिवेशन घेऊन आरक्षणाचा प्रश्न निकाली लावल्याचा दावा केला जात आहे. मात्र, मनोज जरांगे अजूनही समाधानी झालेले नसून, त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार पुकारलाय. आजपासून गावोगावी सकाळी 10.30 पासून रास्तारोको आंदोलन करा, दुपारी एक वाजेपर्यंत रास्तारोको करा, असे आवाहन मनोज जरांगेंनी केले आहे.
दरम्यान मनोज जरांगे यांनी आंदोलकांना आंदोलन करताना सावध राहा, व्हिडिओ शुटींग करा असा सल्लाही दिला आहे. मनोज जरांगे यांनी सगयासोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी आजपासून आंदोलनाची हाक दिलीय. आज राज्यभरात एक दिवस रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तर बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षेमुळे आज आंदोलनाची वेळ बदलून 11 ते 1 करण्यात येणार असून पुढे याच रास्ता रोको आंदोलनाचे रूपांतर धरणे आंदोलनात करण्यात येणार आहे.
25 फेब्रुवारीपासून राज्यभरात गावागावात ग्रामपंचायत किंवा मंदिरासमोर धरणे आंदोलन करण्याचे अवाहन जरांगे यांनी केले आहे. तसेच 25 पासून होणाऱ्या धरणे आंदोलना दरम्यान दररोज आपल्या सगयासोयऱ्याच्या मागण्यांचे निवेदन शासनाच्या प्रतिनिधीला द्यायचे आहे, हे निवेदन गावात 10 च्या आत शासनाचा प्रतिनिधी आला पाहिजे तो न आल्यास, रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणसाठी आज होणाऱ्या रस्ता रोको आंदोलना दरम्यान जिल्ह्यातील अनेक मराठा कार्यकर्त्यांना CRPC 149 अन्वये नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या नोटीसीनुसार प्रत्यक्ष आंदोलन केल्यास किंवा इतर कोणाकडून (हस्तकाकडून) आंदोलन करून घेतल्यास कारवाई केली जाईल. तसेच सदर नोटीस ही पुरावा म्हणून वापरली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.