मुंबई : वृत्तसंस्था
देशातील कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतेच सरकारवर गंभीर आरोप केल्यानंतर आता महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचाच मेंदू चोरीला गेला आहे. त्यामुळेच ते वारंवार मतदानाबाबत खोटी विधाने करत असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सनसनाटी निर्माण करण्यासाठी राहुल गांधी असले आरोप करत असून महाराष्ट्रात अथवा देशात कुठेच मतचोरी झाली नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतचोरी झाल्याचा आरोप केला. यापूर्वीही त्यांनी महाराष्ट्रात मतदार वाढल्याचे सांगत आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कठोर शब्दांत टीका केली. राहुल गांधी खोटे बोलतात आणि पळून जातात. प्रत्येक वेळी वेगळीच आकडेवारी देत राहतात.
मागच्या वेळी त्यांनी महाराष्ट्रात 75 लाख मतदार वाढल्याचा आरोप केला होता. आता म्हणतात एक कोटी मतदार वाढले. दरवेळी काहीतरी नवे सांगून सनसनाटी आरोप करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे फडणवीस म्हणाले.