छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील जालना रोडवर सिडको एन 3 भागात एक गॅसचा टँकर दुभाजकाला धडकला. त्यानंतर टँकरमधून गॅसगळती होत आहे. याचा फटका वाहतूकीवर झालेला दिसतोय. जालना रोडवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प करण्यात आली असून पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. तसेच, सिडको परिसरातील नागरिकांना घरातील गॅस न पेटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जालना रोडवरील वसंतराव नाईक कॉलेजसमोर गुरुवारी पहाटे एचपी गॅसचा टँकर उलटून गॅस गळती होत असल्याची घटना घडली. घटनास्थळी सहा पेक्षा अधिक अग्निशमन दलाचे बंब व पाण्याचेही टँकर दाखल होऊन पाण्याचा मारा सुरू आहे. या परिसरात कोणीही जाऊ नये, असे आवाहन पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी केले आहे. संपूर्ण वाहतूक थांबवण्यात आली असून, चार तासांसाठी तीन उपकेंद्रांवरील वीजही बंद करण्यात आली आहे. वसंतराव नाईक, शिवछत्रपती कॉलेज, कॅनॉट प्लेस, हायकोर्ट, सिडको बसस्थानक या परिसरात घरगुती अथवा कुठलेही ज्वलनशील पदार्थ न पेटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.