ध्यास विश्वसार्ह बातमीचा

“गौतम भाई आमच्यासाठी कुटुंबातीलच” – सुप्रिया सुळे

मुंबई वृत्तसंस्था : बारामतीत आज राजकारण, उद्योग आणि शिक्षण क्षेत्राच्या संगमाचे चित्र पाहायला मिळाले. विद्या प्रतिष्ठान येथे शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरचे उद्घाटन उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांनी अदानी कुटुंबाशी असलेल्या आपल्या ३० वर्षांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा उल्लेख करत भावनिक शब्दांत भावना व्यक्त केल्या.

“गौतम भाई आणि प्रीती भाभी हे माझ्यासाठी केवळ पाहुणे नसून माझ्या हक्काचे मोठे भाऊ आणि वहिनी आहेत. गेल्या तीन दशकांपासून आमच्यात प्रेम आणि विश्वासाचे नाते आहे,” असे सांगत सुप्रिया सुळे यांनी अदानी कुटुंबाचे मनापासून स्वागत केले. आयुष्यातील सुख-दुःखाच्या क्षणी हक्काने ज्यांच्याशी संवाद साधते, ते गौतम अदानी असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार, सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरच्या उद्घाटनावेळी सुप्रिया सुळे यांनी तंत्रज्ञानाच्या वाढत्या भूमिकेवर भाष्य करताना, “तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी शिक्षकाची जागा ते घेऊ शकत नाही, कारण माया आणि संस्कार देण्याची ताकद फक्त माणसाकडेच आहे,” असे स्पष्ट केले.

अदानी ग्रुप आणि विद्या प्रतिष्ठान यांच्यातील सहकार्यामुळे संशोधन, नवोपक्रम आणि कौशल्य विकासाला चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बारामतीत झालेल्या या कार्यक्रमामुळे उद्योग, शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नव्या संधींचे दार उघडल्याचे चित्र दिसून आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!