वागदरी : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथून गेल्या चार वर्षांपासून प्रकाशित होणारा गावगाथा दिवाळी अंकाला यंदा अखिल मराठी पत्रकार संस्था (रजि) महाराष्ट्र राज्य संलग्न पुणे पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय दिवाळी अंक २०२५ स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी उत्कृष्ट आशय, मांडणी व सामाजिक विषयांच्या प्रभावी सादरीकरणाबद्दल गावगाथा दिवाळी अंकाला राज्यस्तरीय उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेत राज्यभरातील विविध दिवाळी अंकांनी सहभाग घेतला होता. त्यामधून निवड झालेल्या पहिल्या चार उत्कृष्ट दिवाळी अंकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये गावगाथा दिवाळी अंकाने आपली वेगळी ओळख निर्माण करत हा मानाचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला.
यावेळी गावगाथा दिवाळी अंकाचे संपादक धोडपा नंदे व दत्ता नंदे यांनी उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व विचारवंत हेमंत देसाई तसेच पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे होते.
यावेळी पिंपरी चिंचवड मनपाचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. राणी पठारे, उपमहापौर सौ. शर्मिला बाबर, ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे तसेच माजी महापौर योगेश बहल यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजन पुणे पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. संपूर्ण पत्रकार संघाच्या टीमने कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. गावगाथा दिवाळी अंकाला मिळालेल्या या राज्यस्तरीय सन्मानाबद्दल विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.