जळगाव : प्रतिनिधी
सोने-चांदीवरील सीमा शुल्क कमी करण्याच्या घोषणेनंतर मंगळवारी मोठ्या घसरणी पाठोपाठ बुधवारी (२४ जुलै) सोन्याचे भाव पुन्हा ७०० रुपयांनी कमी झाले. त्यामुळे सोने ७० हजार रुपये प्रति तोळ्यावर आले आहे. चांदीच्या भावात मात्र ५०० रुपयांची वाढ होऊन ती ८६ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मंगळवारी (२३ जुलै) केंद्रीय अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील सीमाशुल्क करण्याची घोषणा झाली आणि त्याच दिवशी लगेच सोन्याचे भाव दोन हजार ८०० रुपयांनी कमी होऊन ७० हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर आले होते. दुसन्या दिवशी बुधवारी (२४ जुलै) सकाळी पुन्हा २०० रुपयांची घसरण होऊन ते ७० हजार ५०० रुपयांवर आले. त्यानंतर दुपारी लगेच ५०० रुपयांची घसरण झाल्याने सोने ७० हजार रुपये प्रति तोळ्यावर आले. मंगळवारी चांदीचेही भाव तीन हजार ८०० रुपयांनी कमी होऊन ती ८५ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली होती. बुधवारी मात्र चांदीत ५०० रुपयांची वाढ होऊन ती ८६ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली.