नवी दिल्ली – वृत्तसंस्था
येत्या काही दिवसात दिवाळी येणार असून देशातील सुमारे १ कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी खुशखबर आहे. दिवाळीपूर्वी या सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) ३% नी वाढ केली जाण्याची शक्यता आहे. २५ ऑक्टोबरपर्यंत केंद्र सरकार महागाई भत्त्याच्या वाढीची घोषणा करू शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, सरकारद्वारे कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ केल्याने सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए ५० टक्क्यांनी वाढून ५३ टक्के होणार आहे. कॅबिनेटमध्ये याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांनाही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याची थकबाकी मिळणार आहे. ऑल इंडिया कंज्युमर प्राइस इंडेक्सवर आधारित महागाई भत्ता असतो. जर महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ झाली तर ज्यांची बेसिक सॅलरी १८,००० रुपये आहे. त्यांनी महागाई भत्ता ९००० रुपयांत वाढ करुन ९,५४० रुपये मिळणार आहे. जर महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ झाली तर ९,७२० रुपये मिळू शकतात.
विधानसभा निवडणुकांच्या आधी राज्य सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करण्यात आले. महाराष्ट्र सरकारने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं. शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४६ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आलीय. ही वाढ १ जानेवारी २०२४ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे. राज्य सरकारने नुकतेच ऊर्जा विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या भत्त्यात वाढ केली होती. त्यानंतर शासनातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ जुलै महिन्यात घेतलीय.