नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या तब्बल नऊ महिन्यांपासून अंतराळ स्थानकात अडकून पडलेली अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर हे सुखरूपपणे पृथ्वीवर परतले आहेत.
सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मर हे जून 2024 मध्ये आठ दिवसांच्या मोहिमेसाठी अंतराळात गेले होते. मात्र त्यांना घेऊन जाणाऱ्या यानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे दोन्ही पृथ्वीवर परतू शकले नाहीत. यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आश्रय घ्यावा लागला होता. तेथेच ते अडकून पडल्याने चिंतेचे वातावरण निर्मित झाले होते.
या दोन्ही अंतराळविरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी स्पेसएक्स कंपनीच्या यानाला अंतराळात पाठविण्यात आले. या यानाने सुनिता आणि बूच यांना सुखरूपपणे पृथ्वीवर आणले. भारतीय प्रमाण वेळेनुसार आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास या दोन्ही जणांना घेऊन येणारे यान पृथ्वीच्या कक्षेत दाखल झाले. यानंतर पॅराशुटच्या मदतीने या दोघांसह त्यांना घेण्यासाठी गेलेल्या दोन्ही अशा चार जणांनी फ्लोरीडा नजीकच्या समुद्रकिनाऱ्यावर सुखरूपपणे उड्डाण केले. यानंतर त्यांना विशेष जहाजाच्या मदतीने किनाऱ्यावर आणले गेले. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था अर्थात नासाने पत्रकार परिषद घेऊन सुनिता विल्यम्स आणि बूच विल्मर हे सुखरूपपणे परतल्याचे अधिकृतपणे जाहीर केले. यामुळे नासाने सुनिता आणि बूच यांना सुखरूप परत आणून आपल्या क्षमतेला पुन्हा एकदा जगासमोर प्रदर्शीत केल्याचे मानले जात आहे.