सोलापूर : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या पुरवठा विभागाच्या वतीने अंत्योदय योजनेतील जवळपास ५६ हजार महिलांना प्रत्येक वर्षी एक साडी रेशन दुकानावर भेट देण्याची योजना मंजूर करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील त्या-त्या रेशन दुकानावर साड्या वाटप सुरू करण्यात येत आहे. मात्र जिल्ह्यातील काही भागात फाटक्या साड्यांचे वाटप सुरू झाले असून याद्वारे शासनाकडून गरिबांची चेष्टा करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
सोलापूर जिल्ह्यात जवळपास ५१ हजार ५६४ अंत्योदय योजनेचे लाभार्थी आहेत. जिल्ह्यातील विविध तालुक्यातील रेशन दुकानावर आत्तापर्यंत १२१९२ साड्यांचे वाटप करण्यात आले. वाटप करण्यात आलेल्या साड्यांपैकी काही साड्या फाटके आणि निकृष्ट दर्जाच्या असल्याचे निदर्शनास येताच जिल्हा पुरवठा विभागाने तातडीने वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधत त्या बदलून मिळाव्यात, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, साड्या घेण्यासाठी त्या-त्या रेशन दुकानावर लाभार्थ्यांची झुंबड उडाली आहे. शासनाकडून थेट साड्याच वाटप करण्यात येत असल्याने नेमलेल्या एजन्सीने कोणत्या कलिटीच्या साड्या दिल्या याबाबती त जिल्हा पुरवठा विभाग अनुज्ञ असल्याचे दिसून आले. मात्र निकृष्ट आणि फाटक्या साड्यांचे वाटप थांबविण्यात आले असून साड्या बदलून मागितले आहे, असे जिल्हा पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.