सोलापूर : वृत्तसंस्था
विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी एक हजार रुपयाची लाच स्विकारताना तिन्हे येथील ग्रामसेवकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास उत्तर तालुका पंचायती समिती समोर खासगी इसम खालीद शब्बीर नदाफ याच्यासह रंगेहात पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर सोलापूर तालुक्यातील तिन्हे गावचे ग्रामसेवक विठ्ठल पांडुरंग शिंदे यांच्याकडे बेलाटी गावाचा अतिरिक्त कारभार आहे. गुरुवारी दुपारी तक्रारदाराने ग्रामसेवकाकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्राची मागणी केली असता, त्यांनी १ हजार रुपयाची लाच मागून ती रक्कम उत्तर सोलापूर पंचायत समिती समोर असलेल्या खालीद नदाफ या ज्युस विक्रेत्याकडे देण्यास सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच स्वीकारताना शिंदे यास रंगेहात पकडले. ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक व त्यांच्या पथकाने पार पाडली. ग्रामसेवक शिंदे याच्या विरोधात सदर बजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.