ग्रामस्तरावर गुणवत्तापूर्ण आरोग्यासाठी आयुष्मानभव: योजना : सिरसट;अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात शुभारंभ
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.१३ : आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकांचे आरोग्य खूप महत्त्वाचे आहे आणि यासाठी सरकारने ग्रामस्तरावर गुणवत्तापूर्ण आरोग्य या संकल्पनेतून आयुष्मानभव: ही योजना आणली आहे त्याचा लाभ प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने घ्यावा,असे आवाहन तहसीलदार
बाळासाहेब सिरसट यांनी केले.बुधवारी,ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथे आयुष्मानभव: या राज्यव्यापी कार्यक्रमाचा अक्कलकोट तालुक्यात शुभारंभ करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.व्यासपीठावर गट विकास अधिकारी सचिन खुडे,विस्तार अधिकारी महेश भोरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड म्हणाले, आयुष्मान कार्डच्या माध्यमातून सामान्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार घेणे शक्य होणार असून यासाठी आयुष्मान भव ही महत्वाकांक्षी मोहीम १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत राबविली जाणार आहे. मोहिमेत पात्र लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड नोंदणी करून त्याचे वितरण करण्यात येणार आहे.
ही मोहीम राबवताना गावपातळीपर्यंत गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा देणे गरजेचे आहे.तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी, रक्तदान मोहीम, अवयवदान जागृती मोहीम, स्वच्छता मोहीम, १८ वर्षांवरील पुरुषांची आरोग्य तपासणी अशा मोहिमा राबविण्यात येतील.गटविकास अधिकारी खुडे यांनी आभाचे कार्ड कसे काढून घ्यावा त्याचे फायदे काय आहेत याबद्दलची माहिती दिली. या कार्यक्रमाअंतर्गत मृत्यूनंतर अवयवदान करणे किती काळाची गरज आहे यामुळे माणसाचा पुनर्जन्म मिळतो त्यामुळे सर्वांनी याचा विचार करावा,असे आवाहन मान्यवरांनी केले.यावेळी उपस्थित सर्वांनी अवयवदनाबद्दल शपथ घेतली.या कार्यक्रमाला ग्रामीण रुग्णालयाचे सहाय्यक अधीक्षक युसूफ शेख ,आयुषचे वैद्यकीय अधिकारी
डॉ.सतीश बिराजदार तसेच रूग्णालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचालन राघवेंद्र करजगीकर यांनी केले तर आभार हुशेनबाशा मुजावर यांनी मानले.
प्रत्येकाच्या घरोघरी
होणार कार्डचे वाटप
देशवासियांच्या निरोगी आयुष्यासाठी साकारलेल्या ‘आयुष्मान भव’ मोहिमेची सुरूवात अक्कलकोटसह संपूर्ण राज्यात करण्यात आली आहे. यात गावपातळीवर २ ऑक्टोबर रोजी आयुष्यमान ग्रामसभा होणार असून ती आयुष्मान भारत आरोग्य योजनेच्या जाणीवजागृतीसाठी महत्वपूर्ण ठरणार
आहे. प्रत्येकाच्या घरोघरी या कार्डचे वाटप होणार आहे.