बीड : वृत्तसंस्था
गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील दोन्ही पवार गट एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरु असतांना आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांना आपल्या स्वागतासाठी कोणतीही शाल, हारतुरे किंवा स्मृतीचिन्ह न आणण्याची विनंती केली. आई-बापाच्या व चुलत्याच्या कृपेने आपले खूप चांगले चालले असल्याचे ते यासंबंधी बोलताना म्हणालेत. त्यांच्या या विधानामु्ळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार का? अशी चर्चा रंगली आहे.
अजित पवार म्हणाले, आम्ही कितीही चांगले काम केले तरी ते टिकवून ठेवण्याचे काम तुमचे आहे. का मी येऊन बघू तुटली का रे खुर्ची? मी करून देईल. पण तुमचे तुम्ही स्वच्छ ठेवले पाहिजे. नाही तर इथून पच्चकन कुठेतरी थुंकायचे. काहीतरी गुटखा खायचा. दुसरे काहीतरी खायचे. असे चालणार नाही. तुम्ही स्वतःलाही चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे. कुठे बाहेर गेले की, मला पंढरपूरला टाकतात तशा जरीच्या शाली घालतात. त्याच्यात कागद तसाच राहतो. हार आणला की, पिशवी तिथेच टाकतात. मी स्वतः ती पिशवी उचलतो. त्यानंतर लाजत दादा राहू द्या आम्ही उचलतो म्हणत लोक उचलतात.
अरे बाबा तुला मी उचलेपर्यंत कळले नाही काय? काय तुझी अक्कल कुठे गहाण टाकली होती. नका ना आणू… शाली आणू नका. हारतुरे आणू नका. मला टोप्या घालू नका. येऊन नुसता मला नमस्कार करा. तो मला प्रेमाचा वाटेल. कारण, जेवढा मोठा हार, तेवढी मला भिती वाटते. आयला काहीतरी कुठेतरी याने मारली… (प्रचंड हशा) काय मारली ते बघा तुम्ही आणि तो हाराचा बोजा आहे आपल्या मानगुटीवर… स्मृतीचिन्ह काही देऊ नका.
कर्म धर्म संयोगाने… आई-बापाच्या कृपेने… चुलत्याच्या कृपेने बरेच चांगले चालले आहे आमचे. काही देऊ नका… फक्त प्रेम द्या… माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार द्या…. पायाही पडू नका. मी जाहीरपणे सांगतो, आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत. ज्याच्या पाया पडता, त्याची हिस्ट्री आठवा… नंतर अरे मी कुणाच्या पाया पडलो असा प्रश्न पडेल. आई-बापाच्या पाया पडा. गुरुंच्या पाया पडा. मला जो गुरु म्हणून शिकवतो त्यांच्या पाया पडा. पूर्वी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, वसंतराव नाईक आदी मोठी माणसे होऊन गेली. ही लोकं आभाळाएवढी मोठी माणसे होती. त्यांच्यापुढे नतमस्तक व्हा.