---Advertisement---

अजित पवारांनी भरला दम : ‘त्या’ गँगला सुतासारख्या सरळ करेन !

By team
On: April 2, 2025 7:29 PM
Follow Us:
---Advertisement---

बीड  : वृत्तसंस्था

महायुतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहे तर बीड जिल्ह्यात राखेच्या, वाळूच्या गँगसह इतर ही सगळ्या गँग इथेच आहेत. त्या सुतासारख्या सरळ करायच्या असून जो कोणी दादागिरी करेल त्याच्यावर मकोका लावणारच असा दम पुन्हा एकदा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यातून दिला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा सुधारेल असे वाटले होते. मात्र तो सुधारण्याचे नावाच घेत नाही. परंतु हे चालणार नाही. आता तुम्ही युवकांनी देखील याचा विचार करून व्यसनाधिनतेपासून दूर राहून जिल्ह्याची जी बदनामी झाली आहे ती मिटवून टाकून विकसनशील जिल्हा अशी ओळख निर्माण करण्यासाठी पुढे आले पाहिजे असे आवाहन त्‍यांनी केले.

बीड येथे आयोजित युवक मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, निवडणुकीच्या अगोदर अनेक गोष्टी मोठ्या प्रमाणात जाहीर करण्यात आल्या. त्या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी आम्ही सक्षम असून केंद्राचा निधी आणि राज्याचे उत्पन्न स्रोत वाढविणे ही सध्या महत्त्वाचे आहे. त्यासाठी आम्ही दिवसरात्र काम करत आहोत.

मागच्या तुलनेमध्ये कामाचा व्याप वाढलेला आहे. त्या करिता प्रसंगी कर्ज काढावे लागले तरी आम्ही नियमात बसवून तेही करू आणि राज्याला पुढे नेऊ. हे सर्व आम्ही एकीकडे करत असताना तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी आम्हाला पाठबळ द्यायला हवे, मात्र असे न करता दादा आपलेच आहेत असे म्हणून चक्क रस्ता न करता बिल काढालेत हे असे चालणार नाही. मला खोटे नाटे चालत नाही, मी या बाबतीत खूप कडक असून शिस्तीचा आहे. जर असे कोणी आढळले तर मी त्याला सोडणार नाही. भले ते माझ्या कितीही जवळचा असला तरी असे सांगताना अजित पवार यांनी बीडमध्ये फुकटचे बिल उचलायची प्रथा मोठ्या प्रमाणावर आहे. ती आता चालणार नाही. मी पै-पै चा हिशोब घेणार. यात जर कोणी आढळला तर त्याला नाही सोडणार. जिल्ह्यासाठी अशा गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खास अधिकाऱ्यांची नियुक्तीच करणार आहे. आपले कुटाणे झाकण्यासाठी काहीजण स्मृती चिन्ह, शाल, मोठ मोठे हारतुरे, टोप्या घालायला बसले आहेत. हे काही देऊ नका असे यावेळी त्यांनी स्पष्ट सांगून आपला परिसर हा स्वच्छ ठेवा असे सांगितले.

अलीकडे एक नवीन पद्धत पहावयास मिळते, थेट पुढाऱ्यांच्या पाया पडतात. अरे कशासाठी त्याच्या पाया पडता. आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत. त्याच्या ऐवजी तुम्ही आई-वडिलांच्या अनेक गुरूंच्या पाया पडा असा सल्ला देखील त्यांनी या प्रसंगी दिला.

जिल्ह्यात येताच अनेकांनी निधीची मागणी केली. मात्र या निमित्ताने एक गोष्ट सांगतो असे म्हणून त्यांनी महायुतीचा जे सूत्र ठरला आहे. त्या पद्धतीने निधी वाटप केला जाईल अशी स्पष्ट भूमिका मांडली. या बरोबरच कुठल्या कामासाठी निधी मागतात याची शहानिशा केल्यानंतरच त्याला मान्यता देणार असे त्‍यांनी सांगितले. दिवसेंदिवस सोशल मीडिया, प्रसिद्धी माध्यम यावर बोलताना प्रवक्त्यांनी फार तोलून मापून बोलावं उगीच काहितरी एखाद्या समाजाला राग येईल किंवा समाज आपल्या पक्षावर नाराज होईल असेही वक्तव्य करण्याच्या भानगडीत पडू नये अशा सूचना त्‍यांनी दिली. बोलताना माहिती घेऊन बोलावे असे सांगून मी देखील माहिती घेतल्याशिवाय सहसा बोलत नाही असे त्‍यांनी सांगितले. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा- दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचे सात रुपये लिटरने पैसे सोडले आहेत. त्यांना ते मिळाले असतील ही असे सांगून शेतकऱ्याला जिथे तिथे मदत लागेल तिथे तिथे महायुतीचे सरकार पाठीशी आहे असे त्‍यांनी सांगितले.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!