बार्शी : प्रतिनिधी
पुणे येथील नातेवाईक यांचे मार्फत शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून सहा महिन्यात दाम दुप्पट रकमेसह परतावा देते, असे म्हणून एका महिलेने फिर्यादीकडून रक्कम ऑनलाईन व रोख स्वरूपात घेवून तसेच विश्वासाने सुमारे ८ तोळे सोने घेवून ते परत न देता फसवणूक केल्या प्रकरणी सुनिता विश्वनाथ कोकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुलताना निजाम शेख (वय ४०, रा. ताडसौंदणे रोड संतोषी माता मंदिराजवळ बार्शी, ता. बार्शी) व सुलताना हिच्या एका नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व संशयित आरोपी सुलताना यांच्यामध्ये कामानिमित्त ओळख झालेली होती. त्या ओळखीमधून दि.७ फेब्रुवारी ते नोव्हेंबर २०२३ रोजीच्या दरम्यान वेळोवेळी बार्शी येथे सुलताना हीने फिर्यादी सुनिता हिचा विश्वास संपादन करून माझा पुणे येथील नातेवाईक यांचे मार्फत शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून सहा महिन्यात दाम दुप्पट रकमेसह परतावा देते म्हणून फिर्यादीकडून वेळोवेळी ऑनलाईन व रोख रक्कम असे एकूण ११ लाख रूपये तसेच सोन्याच्या ४० ग्रॅम वजनाच्या पाटल्या व ४० ग्रॅम वजनाचे गंठण असे ३ लाख २० हजार रुपयांचे दागिने असे विश्वासाने १४ लाख २० हजार रुपये घेवून ते परत न देता यातील दोन्ही संशयित आरोपींनी संगनमताने फसवणूक केली. याबाबत सुलताना शेख हिला अटक केली असून अन्य दुसऱ्या संशयिताचा शोध पोलीस घेत आहेत. अधिक तपास सपोनि ज्ञानेश्वर उदार करित आहेत.