ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची शहरात विविध ठिकाणी भेट; विविध परिसरातील नागरिकांशी साधला संवाद

अमरावती : पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज शहरात विविध ठिकाणी भेट देऊन स्वत: पायी फिरून परिस्थितीची पाहणी केली व तेथील नागरिकांशी संवाद साधून एकोप्याचे आवाहन केले.

शहरातील अनुचित घटनांच्या अनुषंगाने शहरात लागू संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी आज सायंकाळी शहरातील विविध भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी विविध नागरिकांशी संवाद साधला. शहरात सर्वत्र शांतता असून, परिस्थिती सुरळीत होत आहे. जनजीवन पूर्वपदावर येत असून, नागरिकांनी असाच एकोपा कायम राखण्याचे आवाहन त्यांनी केले.

जि. प. अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, माजी राज्यमंत्री सुनील देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, महापालिकेचे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, मिलिंद चिमोटे, जयंतराव देशमुख, हरिभाऊ मोहोड आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्र्यांनी महेंद्र कॉलनी, बजरंग टेकडी, अल हिलाल कॉलनी, पठाण चौक, खोलापुरीगेट, हनुमाननगर, सोमेश्वर चौक, सराफा, साबणपुरा, राजकमल चौक आदी विविध परिसराला भेट दिली. तेथील नागरिकांशी संवाद साधला. शहरात शांतता प्रस्थापित होत असून विविध भागातील नागरिकांचे मोठे सहकार्य मिळत आहे. जनजीवन पूर्वपदावर येत असून, अमरावतीत सलोख्याचे वातावरण निर्माण होत आहे. प्रशासन, पोलीस, विविध क्षेत्रातील मान्यवर सर्वजण एकजुटीने शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी योगदान देत आहेत, असा सांगून पालकमंत्र्यांनी विविध भागातील नागरिकांना दिलासा दिला.

यावेळी पालकमंत्र्यांनी कायदे व सुव्यवस्थेसाठी विविध ठिकाणी तैनात असलेल्या पोलीस दलांच्या जवानांशीही संवाद साधला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!