---Advertisement---

छत्रपती शिवाजी महाराज जयंती संदर्भात मार्गदर्शक सूचना

Follow Us:
---Advertisement---

मुंबई, दि. २६ : छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा उत्सव तिथीनुसार या वर्षी ३१ मार्च, २०२१ रोजी साजरा केला जाणार आहे. कोविड-१९ मुळे उद्धभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी तिथीनुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ निमित्ताने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. या दिवशी अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री १२ वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी कोविड-१९ चा प्रादूर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती साजरी करावी.

दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये. त्याऐवजी अशा कार्यक्रमांचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

तसेच दर वर्षीप्रमाणे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिबिरे (उदा.रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी.

आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. कोविड-१९ च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

वरील प्रमाणे नियमांचे पालन करुन शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!