ध्यास विश्वसार्ह बातमीचा

संघर्षातूनच यश मिळते; भरमशेट्टी परिवाराच्या पाठीशी उभा राहणार

भरमशेट्टी यांच्या स्मृतीदिनानिमित्त हन्नुर येथे ३२२ जणांची आरोग्य तपासणी

अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : चपळगाव भागात भरमशेट्टी परिवाराने सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. मंत्री भरत गोगावले यांच्यासोबत प्रथमच या भागात आलो असताना हे कार्य अतिशय जवळून पाहिले. त्यामुळे भविष्यात कोणत्याही प्रसंगी मी भरमशेट्टी परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन, असे प्रतिपादन मोहोळचे आमदार राजू खरे यांनी केले. सत्ता येत-जात असते, मात्र संघर्ष कायम ठेवल्यास यश नक्की मिळते, असे सांगत त्यांनी के.बी. प्रतिष्ठानच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

स्वामी समर्थ कारखान्याचे माजी
उपाध्यक्ष कै.काशिनाथ भरमशेट्टी यांच्या नवव्या स्मृतीदिनानिमित्त हन्नुर येथे के.बी. प्रतिष्ठान व भरमशेट्टी परिवाराच्यावतीने विविध सामाजिक व आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत रक्तदान तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

हन्नुर येथील महादेव मंदिर परिसरात सकाळी १० वाजता महात्मा बसवेश्वर ब्लड बँक, सोलापूर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिराचे उद्घाटन आमदार राजू खरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील होते. या रक्तदान शिबिरात एकूण १०३ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमास दुधनीचे नूतन नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय स्वामी समर्थ कारखान्याचे अध्यक्ष संजीवकुमार पाटील, संयोजक विश्वनाथ भरमशेट्टी, ज्येष्ठ नेते दिलीप सिद्धे, सिद्धार्थ गायकवाड, बाळासाहेब मोरे, दिलीप बिराजदार, बाबासाहेब पाटील, अशपाक अगसापुरे, सिद्धाराम भंडारकवठे, राजू पाटील, इरसंगप्पा गड्डे, बसवराज बाणेगाव, संजय बाणेगाव, महादेव वाले, दिलीप काजळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना संजीवकुमार पाटील म्हणाले की, पाटील परिवार आणि भरमशेट्टी परिवार यांचे संबंध अतिशय जुने असून दोन्ही कुटुंबे एकमेकांशी घट्ट जोडलेली आहेत. माजी आमदार स्व. सिद्रामप्पा पाटील आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना एकत्र आणण्यात कै. काशिनाथ भरमशेट्टी यांचा सिंहाचा वाटा होता, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. माजी आमदार स्व.महादेव पाटील व सिद्रामप्पा पाटील यांनाही एकत्र करण्यामध्येही भरमशेट्टी यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती,असे मल्लिकार्जुन पाटील यांनी सांगितले.

या भागातून काशिनाथ भरमशेट्टी यांच्या रूपाने एक धाडसी व दूरदृष्टी असलेले नेतृत्व हरपले, अशा भावना बाळासाहेब मोरे व दिलीप सिद्धे यांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी के.बी. प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

आरोग्य शिबिरामध्ये हृदयरोगतज्ञ डॉ. निलेश येळापुरे, हृदयरोगतज्ञ डॉ. बसवराज सुतार तसेच स्त्रीरोगतज्ञ डॉ. नेहा येळापुरे-भरमशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत ईसीजी, रक्तातील कोलेस्ट्रॉल तपासणी व स्त्रीरोग तपासणी करण्यात आली. या शिबिरात एकूण ३२२ नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ पारतनाळे व सोपान निकते यांनी केले, तर आभार प्रा. निलेश भरमशेट्टी यांनी मानले.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव भरमशेट्टी, उपाध्यक्ष रमेश छत्रे, सचिव गौरीशंकर भरमशेट्टी, ॲड. विशाल भरमशेट्टी, राजकुमार भरमशेट्टी, तिपण्णा हेगडे, बसवणप्पा सुतार, मनोज भरमशेट्टी, मिलन भरमशेट्टी, शब्बीर मुल्ला, सचिन बिडवे, चंद्रकांत जंगले, नरेंद्र जंगले, निरंजन हेगडे, परशुराम बाळशंकर आदींनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!