ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात मुसळधार पावसाचा तडाखा : 17 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान ; सोलापुरात देखील मोठा फटका !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात गेल्या दोन महिन्यांत अतिवृष्टी व पुरामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल ३० जिल्ह्यांतील १९५ तालुक्यांमध्ये तब्बल १७ लाख ८५ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. यात नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे अतिवृष्टी झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. जळगाव, जालना, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये राज्यात १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर (४२ लाख ८४ हजार ८४६ एकर) क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. त्यात प्रामुख्याने खरीप शेतपिकांचे नुकसान झाले असून सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग, भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांना मोठा फटका बसला आहे. ऑगस्टमधील अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यांतले पंचनामे पूर्ण होऊन शेतक-यांना भरपाई देण्यात आली आहे.

अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हिंगोली, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड, नागपूर आणि पुणे या जिल्ह्यांना झाला असून पिकांचे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पावसाने कहर केला असून, सुमारे ७ हजार हेक्टरपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झाले आहे.

अचानक आलेल्या पावसामुळे केळी, कापूस, सोयाबीन आणि मका यांसारखी पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतक-यांच्या तोंडचा घास पळवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुक्ताईनगर तालुक्यात सरासरी ६७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे ३५ गावे बाधित झाली आहेत. आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांना या नुकसानीची माहिती दिली असून, तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सर्वाधिक बाधित जिल्हे
नांदेड – ७२८,०४९ हेक्टर
वाशीम – २०३,०९८ हेक्टर
यवतमाळ – ३१८,८६० हेक्टर
धाराशिव – १,५७,६१० हेक्टर
अकोला – १७७,४६६ हेक्टर
सोलापूर – ४७,२६६ हेक्टर
बुलढाणा – ८९, ७८२ हेक्टर

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!