अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
केवळ अक्कलकोट तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मिटावा, यासाठी मागील काळात भाजपाला सुमारे तीन निवडणुकांत मदत केली, असा गौप्यस्फोट माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. एकरुख पाणी योजनेवरून अक्कलकोट तालुक्यात काँग्रेस नेते म्हेत्रे आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. नेत्यांबरोबच कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियामध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.
देशातील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्या दृष्टिकोनातून राजकीय पक्षांकडून मोठी तयारी केली जात आहे. आतापासूनच बैठका आणि सभांना ऊत आला आहे. सोलापुरातदेखील राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी केली जात आहे.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे हे अत्यंत संयमी नेते म्हणून परिचित आहेत. विकासाची दूरदृष्टी असलेला नेता म्हणून त्यांची ख्याती आहे पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले की, एकरुख पाणी योजनेला माजी आमदार (स्व.) बाबासाहेब तानवडे यांनी मंजुरी आणली होती.
पुढे मी आमदार झाल्यानंतर तत्कालीन शिवसेना-भाजपा युती सरकारने एकरुख पाणी योजनेला स्थगिती दिली होती. अक्कलकोटमध्ये विरोधी विचारांचा म्हणजे काँग्रेसचा उमेदवार म्हणून मी निवडून आलो होतो, त्यामुळे युती सरकारने ही योजना गुंडाळली होती. एकरूख पाणी योजनेला मध्यंतरी सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) मिळण्याची गरज होती. निधी असतानाही तो या योजनेसाठी खर्च करता येत नव्हता, त्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता आवश्यक होती. दरम्यान या योजनेसाठी सुप्रमा मिळाली नसती तर ही योजना आणखी बरेच दिवस रेंगाळली असती. भाजपाला मदत केली तरच एकरूख पाणी योजनेला सुप्रमा मिळेल, असे तत्कालीन भाजपा सरकारकडून मला निरोप देण्यात आला होता, असे म्हेत्रे यांनी सांगितले. भाजपाने घातलेल्या अटीमुळे मी काँग्रेसचा आमदार असूनही माझा नाईलाज झाला होता.त्यामुळे भाजपाला मदत करावी लागली. तीन निवडणुकांमध्ये मी भाजपाला मदत केली, असेही म्हेत्रे यांनी सांगितले.
प्रशांत परिचारक यांच्या विधानपरिषद निवडणुकीवेळी, तसेच संजय शिंदे यांच्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी आणि भाजपाचे आमदार विजयकुमार देशमुख यांची सोलापूर बाजार समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपाला मदत केली, असे म्हेत्रे यांनी कबूल केले.