सोलापूर : प्रतिनिधी
सहकार क्षेत्राचे लक्ष लागलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया आहे त्या स्टेजवरून स्थगित करण्यात आली होती आणि नव्याने प्रारूप मतदार यादी तयार करण्याच्या सूचना सहकार पणन विभागाचे उपसचिव संतोष देशमुख यांनी केल्या होत्या. पण त्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अपील वर निकाल देताना एका महिन्यात आहे त्या स्थितीवरून निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी असे आदेश उच्च न्यायालयाने दिले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
31 डिसेंबर 2024 रोजी राज्याच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने नवा अध्यादेश काढून या सूचना केल्या आहेत त्यामध्ये,
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रमासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मान्यता दिलेली अंतिम मतदार यादी दि.०१.०६.२०२४ अखेरच्या दिनांकास धरुन केलेली असल्याने, सदर मतदार यादीस दि.०२.१२.२०२४ रोजी ०६ महिने पूर्ण झाले आहेत. त्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचा दि.०१ जानेवारी, २०२५ पासून आहे त्या टप्यावर सुरु होणारा निवडणूक कार्यक्रम स्थगित करुन नव्याने प्रारुप मतदार यादी तयार करुन सुधारीत निवडणूक कार्यक्रम राबविण्यात यावा असे सूचित करण्यात आले होते.
दरम्यान या स्थगिती आदेशाच्या विरोधात दक्षिण सोलापूर तालुक्यातील निम्बर्गी येथील विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक बसवराज माळगे, राष्ट्रवादी अजित गटाचे बसवराज बगले यांच्यासह इतर हे उच्च न्यायालयात गेले होते. त्याची सुनावणी होऊन बुधवारी सकाळी उच्च न्यायालयाने निकाल देताना सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आहे त्या स्थितीतून पुढे एका महिन्यात पूर्ण करावी असे निर्देश दिले आहेत. मार्च एंड च्या नावाखाली मलई खाण्याचा बाजार समितीच्या प्रशासकाचा डाव आता हाणून पाडण्यात आल्याची अशी चर्चा रंगली आहे. माजी आमदार दिलीप माने दक्षिण सोलापूर तालुक्याचे नेते सुरेश हसापुरे यासह माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री विजयकुमार देशमुख, बसवराज बगले यांची आता भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.