सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरातल्या हिराचंद नेमचंद वाचनालयास पुण्याच्या सुश्री फाऊंडेशन कडून ‘स्वर्गीय विमलाबेन नानलाल भुवा वार्षिक सन्मान समारंभपूर्वक वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात प्रदान करण्यात आला. दहा हजार रुपयाचा धनादेश व सरस्वती देवीचे सोन्याच्या रंगीत फाइलमध्ये फ्रेम केलेले चित्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. प्रारंभी सुश्री फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीराम ओक यांनी स्वागत करुन वाचनालयास पुरस्कार देण्यामागील भूमिका विशद केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजेंद्र मगर होते. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. प्रा. श्रीकांत येळेगावकर यांचे मानवी जीवनात ग्रंथ आणि ग्रंथालयाचे महत्व या विषयावर व्याख्यान झाले. आपल्या भाषणात डॉ. येळेगावकर म्हणाले की , ‘उत्तम ग्रंथाच्या व सकस वाचन’ साहित्यातून माहिती व ज्ञान मिळते. अनोखी सृष्टी पाहता येते. जगायचे का व कशासाठी हे समजते आत्मभान व समाजभान येते. स्वातंत्र्य, समता, बंधूता, मानवता, धर्मनिरपेक्षता, करुणा अशा मानवी मूल्यांचा अविष्कार असलेले ग्रंथ मानवी जीवन समृध्द करतात. ग्रंथ वाचनाने विचारप्रवणता येते. रचनात्मक व विधायक परिवर्तन घडते. मानसिक तणाव कमी होतात. उत्तम वाचक, उत्तम लेखक व नेता होवू शकतो. लोकमान्य टिळक, पंडित नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, न्यायमूर्ति महादेव रानडे, अशा अनेकांचे जीवन ज्ञानसाधनेतून घडले. समृद्ध सार्वजनिक ग्रंथालये लोक विद्यापीठे असतात. जनप्रबोधनाची साधने असतात. ज्ञानमंदिरे असतात. लोकशाही प्रगल्भ करण्यात, सुजाण व सुसंस्कृत नागरिक घडवण्यात ग्रंथालयाची भूमिका महत्वाची असते.
अध्यक्षिय समारोप करताना डॉ. राजेंद्र मगर यांनी हिराचंद नेमचंद वाचनालयात अनेक दुर्मिळ ग्रंथ असून नम्र सेवकवर्ग असल्याने वाचकांना तत्परसेवा मिळत असल्याचा स्वानुभव सांगितला. प्रदीप आवताडे यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले. यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत कामतकर, प्रमुख कार्यवाह डॉ. नभा काकडे, दत्ता गायकवाड, अँड धनंजय माने, माजी आमदार नरसिंग मेंगजी, अँड नीला मोरे, प्रा. पुष्पा आगरकर, प्रा. सुलभा पिशवीकर, डॉ. नवनीत तोष्णीवाल, मोहन सोहनी, नितीन वैद्य, जयंत राळेरासकर, ग्रंथपाल दत्ता मोरे, श्रीपाद शिर्के, अशोक व श्रीमती सुरेखा लांबतुरे, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.