ध्यास विश्वसार्ह बातमीचा

इतिहास घडला : बार्शीत ‘होम मिनिस्टर’ विजेती ठरली तृतीयपंथी पल्लवी !

सोलापूर : प्रतिनिधी

बार्शीच्या इतिहासात प्रथमच एक तृतीयपंथी व्यक्तीने ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय स्पर्धेत बाजी मारत इतिहास रचला आहे. पल्लवी जाधव या तृतीयपंथीय सहभागीने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेत वॉशिंग मशीनचा बहुमान पटकावला.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शशिकांतभाऊ शिंदे युवा मंच व इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत पल्लवीने आत्मविश्वासाने सहभाग घेत विविध प्रश्नांची उत्तरे, कोडी लीलया सोडवत उपस्थितांची मने जिंकली.

या विजयामागे पल्लवीने एका वाक्याचा उल्लेख ‘मंत्रा’सारखा केला – “पल्लवी तू चल पुढे, मी आहे.” या शब्दांनी तिच्या मनात नवा आत्मविश्वास निर्माण केला, असे ती म्हणाली. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सामाजिक कार्यकर्ते विकी खलसे, बाबा वाघमारे यांचा मोलाचा वाटा होता. “तृतीयपंथीयांनीही मुख्य प्रवाहात यावे, हीच आमची इच्छा होती,” असे त्यांनी सांगितले.

या ऐतिहासिक घडामोडीमुळे तृतीयपंथीय समुदायाला नवी दिशा, आत्मविश्वास आणि प्रेरणा मिळाली आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांना खरी मानवंदना देत वंचित घटकांना सन्मानाने सामावून घेण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला, याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!