मुंबई : मुंबईचे माजी आयुक्त परमवीरसिंग यांच्या चिठ्ठीवर जो वाद निर्माण झाला आहे त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज प्रतिक्रिया दिली. गृहमंत्री अनिल देशमुख कोरोना पॉझिटिव्ह असताना त्यांना भेटल्याचा आरोप करणारे माजी आयुक्त परमवीर सिंग यांनी कटकारस्थान करुन महाविकास आघाडीला आणि गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे असे ते यावेळी म्हणाले. त्याबरोबर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा तूर्तास घेतला जाणार नाही असा पक्षाने निर्णय घेतल्याची माहिती नवाब मलिक यांनी यावेळी दिली.
गृहमंत्री अनिल देशमुख हे विदर्भाच्या दौऱ्यावर होते. त्याचवेळी त्यांना कोरोना झाला. १५ दिवस हॉस्पिटलमध्ये नंतर २७ फेब्रुवारीपर्यंत गृहविलगीकरणात होते. २७ फेब्रुवारीला त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. असे असताना पुरावा तयार करून कटकारस्थान करत बदनाम करण्याचा प्रयत्न होता असेही नवाब मलिक म्हणाले. परमवीरसिंग यांनी १७ मार्चला बदली होणार हे माहित असताना १६ मार्चला काहीतरी प्रश्न विचारुन चॅट पुरावा तयार केला. त्या चॅटनुसार गृहमंत्री अनिल देशमुख हे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वाझेना भेटले असा उल्लेख करण्यात आला आहे. हा आरोप गंभीर आहे याची चौकशी होईल या चौकशीत जे निष्पन्न होईल त्यादृष्टीने कारवाई करण्यात येईल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.