ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात : ६ जणांचा जागीच मृत्यू

रायगड : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून महामार्गावर अपघाताची मालिका नियमित सुरु असताना दि.२३ रोजी भरधाव वेगात असलेल्या कारने आधी दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. यानंतर कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. थरकाप उडवणारी घटना जत-जांबोटी राज्य महामार्गावरील मुगळखोडजवळ (ता. रायबाग) शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ भीमाप्पा पडतारी (वय २२), मल्लिकार्जुन रामाप्पा मरेठे (वय १६), आकाश रामाप्पा मरेठे (वय १४), लक्ष्मी रामाप्पा मरेठे (वय १९), नागाप्पा लक्ष्मण यादवन्नावर (वय ४८), हनमंत मल्लाप्पा मल्यागोळ (वय ४२) अशी मृतांची नावे आहेत. तर बाळानंद परसाप्पा माळगी (वय ३७) असे जखमीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार गुर्लापूरहून मुगळखोडच्या दिशेने येत होती. जत-जांबोटी मार्गावरील कार आली असता, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले.

यावेळी कारने समोरून जात असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता, की दुचाकींसह कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. या भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती स्थानिकांकडून मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मृतदेह शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले आहे.
——————————-
दुधनीत उद्या शांभवी गारमेंट्स उद्योग समूहाचा शुभारंभ व हळदी कुंकूचा कार्यक्रम
वैशाली म्हेत्रे यांची माहिती
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील दुधनी येथील शांभवी फाउंडेशनच्यावतीने शांभवी गारमेंट्स उद्योग समूहाचा शुभारंभ व त्यानिमित्त ग्रामीण भागातील महिलांसाठी खास हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली शंकर म्हेत्रे यांनी दिली.
रविवार दि.२५ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार असून त्याचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी महिलांना आमदार शिंदे यांचे मार्गदर्शन होणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे राहणार असून कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते, शिक्षण विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, सेल्स टॅक्सचे अधिकारी अश्विनी पाटील, दुधनी बाजार समितीचे माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे,मिटकॉन पुणेचे चंद्रकांत लोंढे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. ग्रामीण भागातील महिला या सक्षम होऊ शकतात.त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. जर महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या तर कुटुंबाला पुढे नेऊ शकतात, असा आमचा विश्वास आहे त्यामुळे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा प्रयत्न सुरू आहे,असे वैशाली म्हेत्रे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!