मुंबई : वृत्तसंस्था
“शरद पवारांचा १६० जागांचा दावा म्हणजे वरातीमागून घोडे असल्यासारखा आहे,” अशी बोचरी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ईव्हीएमविरोधात कोर्टात जाण्यासाठी आम्ही यापूर्वी सर्व पक्षांना आवाहन केले होते, पण कोणीही सोबत आले नाही. आता फक्त बोंबलत बसले आहेत. किती खोटं बोलायचं, यालाही काही सीमा असते, असे त्यांनी म्हटले.
प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडल यात्रेवर देखील गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले की, या यात्रेचा उद्देश ओबीसी समाजाचे कल्याण नसून, राजकीय समीकरण साधणे आहे. “विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला विरोध केला होता. श्रीमंत मराठा हा एनसीपीचा मूळ आधार आहे आणि त्यामुळे ओबीसी समाज त्यांच्या विरोधात जाईल, ही शक्यता कमी आहे,” असे ते म्हणाले.
ईव्हीएम संदर्भात कोर्टात जाण्याबाबत आंबेडकर म्हणाले की, “निवडणूक आयोगाच्या विरोधात आम्ही यापूर्वी कोर्टात गेलो. मुंबई उच्च न्यायालयाने आमची याचिका फेटाळली असली, तरी आम्ही ती सर्वोच्च न्यायालयात नेली आहे. जर तुमचा लढा खरा असेल आणि मोदींना घाबरत नसाल, तर या प्रक्रियेत सहभागी व्हा,” असे आवाहनही त्यांनी शरद पवारांना केले.
शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या भेटीवरही प्रश्न उपस्थित करत आंबेडकर म्हणाले की, “राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्या कार्यालयात येणाऱ्या-जाणाऱ्यांची नोंद ठेवली जाते. शरद पवारांसोबत जे दोन लोक होते, त्यांची नावे का जाहीर करत नाही?”