सोलापूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील मंगळवेढा शहरालगत असलेल्या नागणेवाडी परिसरात एका घराला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत प्रापंचिक साहित्य जळून अंदाजे ५ ते ६ लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती कुटुंबप्रमुख सेवानिवृत्त एसटी बसचालक रामचंद्र खांडेकर यांनी दिली. दरम्यान, अग्निशामक दल, खासगी टँकर व हनुमंत तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे ही आग आटोक्यात आणण्यात मदत झाल्याने होणारी मोठी दुर्घटना टळली.
रामचंद्र खांडेकर यांचे नागणेवाडीमध्ये दोन मजली घर आहे. २१ नोव्हेंबर रोजी ते मिरजला गेले होते. कुटुंबातील अन्य महिला सदस्य हे त्याच परिसरात असलेल्या हनुमान मंदिरात कीर्तन चालू असल्याने तेथे गेले होते. सायंकाळी चार वाजता इमारतीच्या वरच्या मजल्यावरून धूर येत असल्याचे मंदिरातील काही भक्तांनी पाहिले. त्यांच्यासह हनुमान तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या आगीत दोन मुलांचे विवाह झाल्याने लग्नात आलेले त्या दोघांचे प्रापंचिक साहित्य, फ्रीज, कूलर, न्याहारी सेट, टीव्ही, सायकल, संगणक, कपाट, साड्या, बेड व रोख रक्कम असे एकूण अंदाजे ५ ते ६ लाखांचे प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. नागरिकांनी नगरपालिकेला कॉल करून अग्निशामक दलाची मागणी केली.
मात्र, हे अग्निशामक दल कार्तिक वारीच्या पाश्र्वभूमीवर पंढरपूर येथे गेल्याने ते येण्यास मोठा विलंब झाला. तसेच, खासगी पाण्याचे टँकर मागवून युवकांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत असतानाच अग्निशामक दल हजर झाले. नागणेवाडी हा झोपडपट्टीचा भाग असल्याने घरे लगत असून, रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे अग्निशामक दलाला घटनास्थळी जाणे अवघड झाले. घटनास्थळापासून दूर बंब उभा करून पाण्याचा मारा करण्यात आला. या परिसरातील घरे एकमेकांना चिकटून असल्याने आगीच्या ज्वाळा पाहून परिसरातील नागरिक व कुटुंबीय भयभीत झाले होते. मंगळवेढा तालुक्यात चार साखर कारखाने असताना येथे अग्निशामक दल उपलब्ध नाहीत. नगरपालिका प्रशासनाकडे एक अग्निशामक दल असून, तेही वारीसाठी पंढरपूरला गेल्यामुळे आग कशी आटोक्यात आणायची, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला होता.