पुणे : वृत्तसंस्था
लहानपणापासूनच मला शरद पवारसाहेब यांच्या विचारांची भुरळ पडलेली आहे. माझ्या सर्व पोस्ट या पवारसाहेबांच्यावरच आहेत. त्यामुळे मी कालही शरद पवार यांच्या विचारधारेबरोबर होतो आणि उद्याही राहणार आहे, अशी ग्वाही नगर जिल्ह्यातील पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच खासदारकीच्या उमेदवारीबाबत मात्र कोणतीही चर्चा झाली नाही, असे त्यांनी शरद पवार यांच्या समोरच सांगितले.
महायुतीच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर आमदार लंके हे नगर जिल्हा लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे समोर आले होते. लंके हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशा बातम्या पुढे येत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लंके यांच्यावर कारवाई होणार असल्याचे म्हटले होते. त्यांना आमदारकी गमावावी लागणार असल्याचाही इशारा अजित पवार यांनी दिला होता. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर लोकसभा मतदारसंघाबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना विद्यमान खासदार डॉ. सुजय विखेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार लंके यांनी गुरुवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या कार्यालयात येऊन शरद पवार यांची भेट घेतली. जवळपास एक तास पक्ष कार्यालयात शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार यांच्यात चर्चा झाली. चर्चेनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने ही भेट होती, असे जाहीर केले. पुण्यातील पक्ष कार्यालयाबाहेर यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. या वेळी नगर जिल्ह्यातील माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, राहुल जगताप, प्रताप ढाकणे, पुणे शहर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी महापौर अंकुश काकडे आदी उपस्थित होते.
या बैठकीपूर्वी मनसेला दोन दिवसांपूर्वी जय महाराष्ट्र करणारे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनीही पवार यांची भेट घेतली. बुधवारी नगर जिल्हा लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्याच वेळी लंके यांच्याबाबत ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करतील, अशी शक्यता होती. मात्र, थेट प्रवेश न करता लंके यांनी आपण विचारधारेबरोबर असल्याचे सांगून आगामी काळातील पक्षप्रवेशाचे संकेत दिले आहेत