मुंबई वृत्तसंस्था : मुंबईसह महाराष्ट्रातील एकूण २९ महानगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. सकाळपासूनच विविध मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी पाहायला मिळत असून, अनेक दिग्गजांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
याच पार्श्वभूमीवर ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर यांनी आज मुंबईत सहकुटुंब मतदान करत लोकशाही उत्सवात सहभाग नोंदवला. मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नागरिकांना आवर्जून मतदान करण्याचे आवाहन केले. क्रिकेटच्या उदाहरणातून बोलताना सचिन म्हणाले, “जसं क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव महत्त्वाची असते, तसंच लोकशाहीत प्रत्येक मत महत्त्वाचं असतं. प्रत्येक थेंब जसा महत्त्वाचा असतो, तसाच प्रत्येक व्होटही फार मोलाचा असतो.”
आपले मत व्यक्त करण्यासाठी मतदान हाच सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना उद्बोधित केले. “मी मतदान करायला आलो कारण मला वाटतं की प्रत्येकाचं मत निकालावर परिणाम करतं. हीच ती वेळ आहे, जेव्हा आपलं मत, आपली भूमिका मतदानातून मांडता येते. त्यामुळे सर्वांनी घराबाहेर पडा, मतदान करा आणि या संधीचा योग्य वापर करा,” असे आवाहन त्यांनी केले.
सचिन तेंडुलकरांच्या या भावनिक संदेशामुळे मतदानाबाबत जनजागृतीला बळ मिळाले असून, लोकशाहीच्या या उत्सवात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.