मुंबई : वृतसंस्था
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३४५ वी पुण्यतिथी असून त्यानिमित्त मी ऐतिहासिक रायगडावर प्रेरणा घेण्यासाठी आलो आहे. शिवरायांना महाराष्ट्रपुरते मर्यादित ठेऊ नका. तर छत्रपती शिवाजी महाराज देशासह जगासाठी प्रेरणास्थान आहेत. राज माता जिजाऊंना माझा प्रणाम. त्यांनी शिवरायांना केवळ जन्म दिला नाही, तर स्वराज्य निर्मितीसाठी प्रेरणा, प्रोत्साहन आणि स्वातंत्र्यांचा विचार दिला. त्यामुळेच शिवरायांनी महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्यात रूपांतर करून स्वराज्याचे स्वप्न साकार केले, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.
छत्रपती शिवरायांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, मंत्री आशिष शेलार, खासदार उदयनराजे भोसले आदी उपस्थित होते.
आपल्या सुमारे पंधरा मिनिटांच्या भाषणामध्ये अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध कार्याचा आवर्जून उल्लेख केला. छत्रपती शिवरायांनी सुरू केलेली स्वधर्माची लढाई थांबता कामा नये. सुवर्ण सिंहासन ज्या ठिकाणी होते, तिथे मी शिवरायांना अभिवादन केले. स्वराज्य, स्वधर्म यासाठी शिवरायांनी आयुष्य वेचलं. आदिलशाही, निजामशाही याने वेढलेला महाराष्ट्र हिंदवी स्वराज्यात बदलण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. त्यानंतर मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माच्यावेळी महाराष्ट्र अंधकारात बुडाला होता. स्वधर्म आणि स्वराज्य याबाबत बोलणं लोक गुन्हा समजू लागले होते. पण शिवरायांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी, भगवा फडकवण्यासाठी प्रतिज्ञा घेतली. मी आजवर अनेक नायकांची चरित्रं वाचली आहेत. मात्र, असे साहस मी एकाही राजामध्ये पाहिले नाही. छत्रपती शिवाजी महाराज देशासह जगासाठी प्रेरणास्थान आहेत.