बीड : वृत्तसंस्था
देशात लोकसभा निवडणूक येत्या काही दिवसावर सुरु होणार आहे. त्यापूर्वी अनेक नेते मोठे विधान करून राज्याचे लक्ष वेधून घेत आहे. यात अनेक विरोधी पक्षाचे नेते सत्ताधारी गटावर टीका करीत आहे तर दुसरीकडे आगामी निवडणुकीत आपल्याला संधी मिळावी म्हणून अनेक विधाने करीत आहे. अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील एक मोठ वक्तव्य केले आहे.
देशात सध्या भाजपकडून सध्या गाव चलो अभियान सुरु असून या अभियानाच्या माध्यमातून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये ग्रामस्थांशी संवाद साधला. राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला, माझा वनवास झाला. तुमचं प्रेम पाहण्यासाठीच हे सर्व झालं आहे असे विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले आहे. यावेळी बोलताना “तुमच्याशिवाय मला कोणी नाही. मला तुम्ही वाघीण म्हणालात, मी वाघिणी सारखीच जगेन. राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला, माझा वनवास झाला. तुमचं प्रेम पाहण्यासाठीच हे सर्व झालं आहे”, असे पंकजा म्हणाल्या.
यावेळी पंकजा मुंडे यांनी राजकीय कारकिर्दीवर देखील भाष्य केले आहे. “आपल्यासाठी 2014 ची निवडणूक दुर्दैवाने चांगली ठरली नाही. मुंडे साहेब निवडून आल्यानंतर केवळ काही दिवसात ते आपल्यातून गेले. मी 2009 मध्ये राजकारणात आले आणि संघर्षाला सुरुवात झाली. मुंडे साहेब निवडून आल्यानंतर मला रजा द्या असे म्हणाले. मुंडे साहेबांनी जातीपातीचे राजकारण करायचं नाही असं सांगितले. आपली जात केवळ वंचित आहे. त्यांच्यासाठी काम करायचे आहे”, असे पंकजा म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, ”माझ्यावर तुम्ही केलेले प्रेम आणि पंतप्रधान मोदींनी सांगितलेल्या कामाची आज जोड मिळाली. अनेक विकासकामे माझ्या काळात मंजूर झाले आहेत. रामापेक्षा रावणाने राज्य जास्त केले. ज्याने आदर्श घालून दिला त्याच रामाचे नाव आपण घेतो. रामाला वनवास भोगावा लागला. ताईचं काय? म्हणून मला सर्व लोक विचारतात. मुंडे साहेब गेल्यानंतर मला लोक ताईसाहेब म्हणतात. माझ्यात लोक मुंडे साहेबांना बघतात म्हणून राज्यभर मला ताईसाहेब म्हणतात”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
यावेळी त्यांनी ग्रामस्थांना आवाहन देखील केले. ”साहेब या उपाधीला कधीही बट्टा लागणार नाही असे मला काम करायचे आहे. राम वनवासात गेले नसते तर प्रभू झाले नसते. माझ्या संघर्षात नेहमी सोबत आहात म्हणून माझा संघर्ष सोन्यासारखा झाला आहे. पुढील संघर्षात देखील तुम्ही माझ्यासोबत राहा”, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं.