मुंबई : वृत्तसंस्था
मुंबई महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत युती करूनही काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. केवळ २४ जागांवर समाधान मानावे लागल्याने काँग्रेसच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत, मुस्लिम मतांकडे पाहण्याची भूमिका बदलली नाही तर भविष्यात नुकसान अटळ असल्याचा थेट इशारा दिला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मुंबईत काँग्रेसच्या नेत्यांना आम्ही वारंवार सूचना दिल्या होत्या. मुस्लिम मतांकडे आपल्या ‘जहागीरी’सारखे पाहू नका, असे स्पष्टपणे सांगितले होते. मात्र काँग्रेसने हे गांभीर्याने घेतले नाही. निवडणूक निकालातून वास्तव समोर आले असून मुस्लिम मतदारांनी काँग्रेसची साथ सोडल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे हिंदू मतदार आधीच काँग्रेसपासून दुरावलेला आहे.”
काँग्रेसचे जे नगरसेवक निवडून आले, ते पक्षाच्या ताकदीवर नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक कामगिरी, संपर्क आणि प्रतिभेच्या जोरावर निवडून आल्याचा दावाही आंबेडकरांनी केला. युती असूनही काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीचा पुरेसा उपयोग करून घेतला नाही, असा आरोप त्यांनी केला.
मुंबईपुरतेच नव्हे, तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेत काँग्रेसची स्थिती अधिकच बिकट झाल्याचे आंबेडकरांनी नमूद केले. “आम्ही काँग्रेसला एक मोठी संयुक्त सभा घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे सकारात्मक संदेश गेला असता. मात्र आमचे काहीही ऐकले गेले नाही. त्याचा परिणाम म्हणजे ११५ जागांच्या महापालिकेत काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले,” असे ते म्हणाले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने ५८ जागा जिंकत स्पष्ट आघाडी घेतली, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १२, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ६ आणि मनसेला १ जागा मिळाली. मात्र या निवडणुकीत सर्वाधिक धक्का देणारा पक्ष ठरला तो असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM ने, ज्यांनी तब्बल ३३ जागा जिंकल्या. काँग्रेसचा जवळपास सफाया झाल्याचे चित्र दिसून आले.
राजकीय गणित मांडताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “जर छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस आणि वंचित एकत्र आले असते, तर ४० ते ४२ जागा निवडून आल्या असत्या. त्यातील १९ ते २० जागा वंचितच्या आणि उर्वरित काँग्रेसच्या असत्या. त्यामुळे AIMIM ला तगडी टक्कर मिळाली असती आणि भाजपलाही एवढी मोठी मुसंडी मारता आली नसती.”
महापालिका निकालानंतर आंबेडकरांच्या या परखड विधानांमुळे काँग्रेसच्या राजकीय वाटचालीवर नव्याने चर्चा सुरू झाली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.