मुंबई वृत्तसंस्था : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या एका महत्वाच्या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. “महाराष्ट्र मजबूत होण्यास मदत मिळत असेल तर ट्रम्पसारख्या व्यक्तीसोबतही सामील होण्यास मी तयार आहे, असे स्पष्ट आणि ठाम विधान राज ठाकरे यांनी केले आहे. राजकीय दृष्टिकोनातील लवचिकता म्हणजे वैचारिक तडजोड नसते, असेही त्यांनी यावेळी ठामपणे नमूद केले.
शनिवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत राज ठाकरे यांनी विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या युतीबाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. मराठी माणसाचं कल्याण, मराठी भाषेचं जतन आणि विकास तसेच एक मजबूत महाराष्ट्र हेच आपले सर्वोच्च उद्दिष्ट असल्याचे राज ठाकरे म्हणाले. उद्दिष्ट स्वच्छ आणि शुद्ध असलं पाहिजे; ते साध्य करण्यासाठी कोणतीही योग्य पद्धत वापरता येते,” असे त्यांनी सांगितले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतरही केंद्र सरकारकडून आर्थिक पाठबळ न मिळाल्याबद्दल राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला, पण एक रुपयाही मराठीसाठी खर्च झालेला नाही. दुसरीकडे संस्कृतसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. सततच्या आर्थिक मदतीशिवाय कोणतीही भाषा टिकू शकत नाही किंवा विकसित होऊ शकत नाही, असा ठाम युक्तिवादही त्यांनी मांडला.
२० वर्षांनंतर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असून ते आगामी निवडणुका एकत्र लढवत आहेत. मात्र ही एकता केवळ मराठी अस्मितेसाठी असून, त्याला राज्य किंवा केंद्र पातळीवरील कायमस्वरूपी राजकीय युती समजणे चुकीचे ठरेल, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. निवडणूक युती हा पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे,” असेही त्यांनी सांगितले.
शेवटी बोलताना राज ठाकरे म्हणाले, “राजकीय पदं किंवा सत्तेपेक्षा महाराष्ट्राचं हित अधिक महत्वाचं आहे. राज्य मजबूत होत असेल, तर कोणालाही पाठिंबा देण्यास मी मागे-पुढे पाहणार नाही.” त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची चर्चा रंगली आहे.