ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बजेटमधून मराठा आरक्षण देता आले तर द्या ; जरांगे पाटलांची टीका

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अजित पवार गटाचे मंत्री मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद आणखी पेटला असून आज अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटलांनी भुजबळांना टोला लगावला आहे. जरांगे पाटील म्हणाले की, अर्थसंकल्पातील मला काहीही कळत नाही. मात्र, ज्यांचे बजेट कोलमडलेले आहे. ते मुंबईला जावूनही काही मिळालेले नाही, असे सांगत आहेत. त्यामुळे जर बजेटमध्ये आरक्षण देता येत असेल, तर ते पटकन देवून टाकावे.

सरकारमधील लोकांनी वेगवेगळ्या प्रकारची विधाने करू नये. सरकारला जे काही करायचे असेल ते त्यांनी दिलखुलासपणे करायला हवे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे. नवीन अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी जरांगे 10 तारखेपासून आमरण उपोषणही सुरु करणार आहेत.

जरांगे पुढे बोलतांना म्हणाले की, काहींचे म्हणणे आहे की मुंबईत जाऊन तुम्हाला काय मिळाले. त्या सर्वांना माझी विनंती आहे. त्यांनी एकदा आंतरवाली सराटीत यावे. त्यासोबतच सोशल मीडियावर लिहिणाऱ्यांनीही यावे आणि आम्हाला अजून काय मिळायला हवं होतं ते सांगावं. अभ्यासकांनीही येऊन यासंदर्भात माहिती द्यावी.
मराठवाड्यातील सर्व मराठे कुणबी असल्याचे सरकारने मान्य केले आहे. अध्यादेश घेऊन आलो आहोत, त्यामुळे काही कसे मिळाले नाही. काहींना टोकरायची सवय आहे, पण गोरगरिबांच्या हाताला काही लागलं आहे. पाच पन्नास लोकं विरोधात बोलत आहेत, त्यांना बोलायची सवयच असल्याचे जरांगे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!