ध्यास विश्वसार्ह बातमीचा

“जीभ नाही हासडली तर…” अबू आझमींच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकारण तापलं

मुंबई वृत्तसंस्था : समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करताना आझमींनी भाषेची पातळी सोडल्याचा आरोप होत असून त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

नितेश राणे यांच्या हिंदुत्व आणि राष्ट्रवादावरील वक्तव्यांचा संदर्भ देत अबू आझमी यांनी आक्रमक आणि वादग्रस्त भाषा वापरली. राणे मुसलमानांना कुराण पठण करायचं असेल तर पाकिस्तानात जा, असं म्हणतात. मला जर ताकद मिळाली तर राणेंची जीभ नाही हासडली, तर मला माझ्या बापाचा मुलगा म्हणून नका,” असे विचित्र आणि संतापजनक विधान आझमी यांनी केले. यावरच न थांबता त्यांनी राणेंवर वैयक्तिक आणि अपमानास्पद टीकाही केली.

आझमी म्हणाले, “तो बुटका मंत्री नेपाळी दिसतो. मशिदीत घुसून मुसलमानांना मारण्याची भाषा करतो. आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का? तुझ्यात दम असेल तर पोलिसांना बाजूला कर आणि मग मशिदीत ये, तुझी अवस्था काय होते ते पाहू,” अशी जहरी टीका त्यांनी केली. तसेच “आजपर्यंत एखादा मुस्लिम मंदिराबाहेर नारे देताना दिसला आहे का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अबू आझमी यांनी पुढे आरोप केला की, आम्ही रामनवमीला पाणी वाटप करतो, मात्र हे मंत्री आम्हाला देशात राहायचं असेल तर ‘वंदे मातरम्’ म्हणावं लागेल, अशी धमकी देतात, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी याआधी हिंदुत्व, राष्ट्रवाद तसेच रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावर तिखट भूमिका मांडली होती. आम्ही हिंदुत्व आणि राष्ट्रवादासाठी काम करतो, सामाजिक किंवा धार्मिक ध्रुवीकरणासाठी नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी धार्मिक मिरवणुकांवरीलगडफेकीचा मुद्दा उपस्थित केला होता. “ईद किंवा मोहरमदरम्यान असे प्रकार होत नाहीत, मग रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुकांवर दगडफेक का होते?” असा सवाल त्यांनी केला होता.

राणे यांनी हेही स्पष्ट केले होते की, “माझा कोणत्याही धर्माविरुद्ध किंवा देशभक्त, राष्ट्रभक्त मुस्लिमांविरुद्ध विरोध नाही. मात्र जे लोक जिहादचा मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न करतात, त्यांना विरोध करणे स्वाभाविक आहे.” या पार्श्वभूमीवर अबू आझमींच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून, त्यांच्या विधानांवर सर्वच स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!