सोलापूर जिल्ह्यात राजकारण करायचे असेल तर मोहिते पाटलांशिवाय पर्याय नाही
सुशीलकुमारांच्या सत्कारातुन पवारांनी दिला जिल्ह्याला संदेश
अकलूज : प्रतिनिधी
येथे मोहिते पाटील परिवाराच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सन्मान सोहळा व राज्यातील नवनिर्वाचीत खासदारांचा सत्कार अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . अकलुजच्या विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलाच्या भव्य प्रांगणात पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील सुमारे ५० हजार मोहिते पाटील प्रेमी कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले होते .
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाशी बंडखोरी करुन मोहिते पाटलांनी पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेतला होता . आ रणजितसिंह मोहिते पाटील वगळता संपुर्ण मोहिते पाटील परिवार लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरला होता . अर्थात रणजितसिंह हे प्रत्यक्ष रणांगणात नसले तरी पडद्यामागची सर्व सुत्रे तेच हलवत होते हे काही झाकुन राहिले नाही . लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील परिवाराने माढा तर जिंकलाच त्याच बरोबर सोलापूर व बारामती या दोन्ही लोकसभा मतदारसंघात आपली ताकद वापरुन या मतदारसंघातही विजय मिळविण्यात सिंहाचा वाटा मिळविला . सातारा लोकसभा मतदार संघात उदयनराजे यांना भाजपने उमेदवारी दिल्याने राजे विरुध्द आपण प्रचार करणार नाही हे जयसिंह मोहिते पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले होते व त्यांनी ते पाळलेही . तेथे राष्ट्रवादीच्या आ शशिकांत शिंदेंचा निसटता पराभव झाला हे सर्वसृत आहे .
या लोकसभा निवडणुकीनंतर मोहिते पाटील परिवाराने अकलूजमध्ये घेतलेला हा जिल्ह्यातीलच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा व शक्तीप्रदर्शन करणारा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते . मोहिते पाटलांच्या मते या अ राजकीय कार्यक्रमाच्या व्यासपिठावर भाजप , शिवसेना शिंदेगट व राष्ट्रवादी अजित पवार गट वगळता महाविकास आघाडीचे सर्वच नेते , कार्यकर्ते उपस्थित होते आणि या व्यासपिठावर आ रणजितसिंह मोहिते पाटील जे भाजपचे आमदार आहेत ते उपस्थित झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या . वास्तविक पाहता हा मोहिते पाटील यांचा घरगुती कार्यक्रम होता असे जरी मानले तरी या व्यासपिठावर शरद पवार , सुशीलकुमार शिंदे , जयंत पाटील , बाळासाहेब थोरात या दिग्गजांसह कॉंग्रेस , राष्ट्रवादी व शिवसेनेचे नवनिर्वाचीत खासदार होते आणि त्यामुळे हा कार्यक्रम राजकीय व त्यातल्या त्यात महाविकास आघाडीचा होता त्यामुळे आ रणजितसिंह मोहिते पाटील या व्यासपिठावरुन कोणती सिंहगर्जना करणार हे ऐकण्यासाठी हजारो मोहिते पाटील समर्थक या कार्यक्रमाला उपस्थित झाले होते .
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच खा धैर्यशील मोहिते पाटील व आ रणजितसिंह मोहिते पाटील यांनी २००९ पुर्वीची जिल्ह्यातील व राज्यातील राजकीय परिस्थिती व आजचे राजकारण यावर परखडपणे भाष्य केले आणि जिल्ह्याची व राज्याची विस्कटलेली घडी ही पुन्हा व्यवस्थित करण्याची गरज बोलुन दाखविली . राजकारणाचा तोच धागा पकडत खा विशाल पाटील , आ जयंत पाटील , आ बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील व देशातील राजकीय घडामोडीवर जोरदार बॅटिंग केली पण त्यानंतर एका राजकीय उंचीवर गेलेला हा सन्मान सोहळा भावनीक करण्याचे काम खा शरद पवारांनी केले परंतु माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मला करमाळ्यातुन विधानसभेची उमेदवारी द्यावी म्हणून शरदरावांनी १९७२ ला प्रयत्न केला होता . पण पार्लमेंटरी बोर्डाने नाकारला . दुर्देवाने आ तायाप्पा सोनवणे यांचे निधन झाले व पोटनिवडणुक लागली . यावेळी शरदरावनी मला विजयदादांचे पत्र घ्यायला सांगितले . कारण विजयदादा त्यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते . मला तिकीट मिळाले व मी आमदार झालो . नंतर मला समजले की शरदरावांनी मला विजयदादांचे पत्र घ्यायला का सांगितले . यामागे त्यांचा हेतु स्पष्ठ होता की जिल्ह्यात राजकारण करायचे असेल तर मोहिते पाटलांचा आशिर्वाद हवाच . सुशीलकुमार शिंदेच्या या वाक्याने पवारांना जो जिल्ह्यात संदेश द्यायचा होता तो त्यांनी योग्यरित्या दिला . वरवर पाहता हा सुशीलकुमारांच्या सत्काराचा कार्यक्रम होता पण या कार्यक्रमाच्या माध्यमातुन पवारांना जे साध्य करायचे होते ते त्यांनी केले .
आ रणजितसिंह मोहिते पाटील हे पाच वर्षानंतर प्रथमच महाविकास आघाडीच्या मंचावर आले होते . त्यामुळे ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील व जिल्ह्याच्या व राज्याच्या राजकारणावर खा शरद पवार तोफ डागतील हे ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आलेला हजारो मोहिते पाटील समर्थक मात्र नाराज झाला . परंतु या कार्यक्रमाच्या माध्यमातुन पवारांना जिल्ह्यात जो मेसेज द्यायचा होता तो सुशीलकुमार शिंदे यांच्या भाषणाने गेला . कारण समोर विधानसभा आहे आणि या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याची सर्व राजकीय सुत्रे ही ” शिवरत्न ” वरुनच हालणार आहेत . पवार साहेबांनी विजयदादांच्याच हातात जिल्ह्याची सर्व सुत्रे सुपूर्द केली आहेत आणि ही सुत्र आ रणजितसिंह आणि खा धैर्यशील हे दोघेच बंधु संभाळणार आहेत . गेल्या पंधरा वर्षात जिल्ह्यातील राजकारणाची जी वाताहात झाली आहे . ती पुन्हा पुर्वपदावर आणण्यासाठी या दोघा बंधुनी आता कंबर कसली आहे हेही लोकांच्या लक्षात आले . येथुन पुढचे राजकारण हे अकलूजच्या ” शिवरत्न ” वरुनच पाहिले जाणार हा जो संदेश राज्यभर पाठवायचा होता तो व्यवस्थित पाठविला गेला हे मात्र नक्की .
सूर्यकांत भिसे
9822023564